“आज माझ्याजागी कोणीही असतं तरी त्यानेही हेच केलं असतं” अक्षय खन्नावरून ट्रोल झालेल्या संतोष जुवेकरचं स्पष्टीकरण

छावा चित्रपटामुळे संतोष जुवेकर प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पण काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमुळे तो चांगलाच ट्रोल होत आहे. ‘मी सेटवर असताना अक्षय खन्नाकडे पाहिलं सुद्धा नाही’ असं त्याचं वक्तव्य ऐकून लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या ट्रोलिंगला उत्तर देताना संतोष जुवेकर म्हणतो की, ” मी विकी कौशलला सुद्धा सेटवर अरेतुरे करायचो. यावरूनही मी ट्रोल झालो. पण खरं सांगू का आम्ही त्या सेटवर जवळपास ६ महिने एकत्र घालवले होते. त्यामुळे आमच्यात एक छान मैत्रीचं बॉण्ड तयार झालं होतं.
उलट विकी कौशलला स्वतःला करमत नसलं की आम्हाला सेटवर बोलावून घ्यायचा. त्यामुळे फक्त मीच नाही तर माझ्यासोबत असलेले सहकलाकार यांचही त्याच्यासोबत छान जुळून आलं होतं. अक्षय खन्ना यांच्याबद्दल मी मुलाखतीत जे बोललो ते लोकांनी पूर्ण एकूणच घेतलं नाही. अक्षय खन्नाला मी का भेटलो नाही याचं मी तिथेही कारण सांगितलं होतं. त्याची अभिनय क्षमता ही खूप मोठी आहे तो मोठा स्टार आहेच मी तर अजूनही स्ट्रगल करतोच आहे. पण खरं सांगू का माझ्या राजाला ज्याने हा त्रास दिला त्याला मला भेटावस नव्हतं वाटलं , माझ्या मनात त्यांच्याविषयी चीड होती.

आज जो मला ट्रोल करतोय तो जरी माझ्या जागी असता ना तर त्यानेही हेच केलं असतं, मला ते नव्हतं बघवत म्हणून मी नाही बोललो अक्षय खन्नाशी. मला अनेकजण म्हणतात की तुझा रोल किती आणि बोलतो किती?. मी बोलतो कारण छावा चित्रपटाचा मी एक भाग आहे. अक्षय खन्नाला मी त्या गेटअपमध्ये पाहिलं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर पडला, मलाच नाही कोणालाही त्याचा रागच येईलच ना! पण याचा अर्थ अक्षय खन्ना वाईट आहे हे नाही होत. लोकांनाही त्याला स्क्रीनवर पाहून राग आला होता, त्या त्यांच्या भावना होत्या. “