
नुकताच छावा चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ५०० कोटींचा पल्ला पार केला आहे. या चित्रपटाने सहाय्यक भूमिकेत झळकलेल्या अनेक मराठी चेहऱ्यांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. अर्थात भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि अभिनयाची जोड यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या चित्रपटातला एक सीन तुम्हाला धडकी भरायला लावणारा ठरला आहे. जेव्हा औरंगजेब त्याची लाखोंची फौज घेऊन स्वराज्याचे दिशेने दाखल होतो तेव्हा त्याची पहिली शिकार ठरते ती ही मुलगी. शेळ्या मेंढ्या वळणारी ही तरुणी काहीतरी विचित्र घडणार याचा संकेत देते.
त्याचक्षणी मागून येणारे मुगल सैन्य तिला जाळून टाकताना दिसतो. चित्रपटात अनेक आव्हानात्मक सीन शूट करण्यात आले आहेत त्यातला हा सीन शूट करण्यासाठी टीमला मोठी मेहनत घ्यावी लागली होती. अर्थात कलाकारांचीही मेहनत तेवढीच महत्वाची ठरते. हा स्टंट करणारी तरुणी मराठमोळी आहे हे जाणून तुम्हालाही तिचं नक्कीच कौतुक वाटेल. या स्टंटगर्लचं नाव आहे साक्षी सकपाळ.

साक्षी सकपाळ हिला स्टंट करण्याची खूप आवड आहे. डान्सर , स्टंट आर्टिस्ट आणि डान्स इंडिया डान्सचा स्पर्धक सद्दाम शेख यांच्याकडे ती याचे धडे गिरवत आहे. छावा चित्रपटातील या भूमिकेसाठी साक्षीची ऑडिशनद्वारे निवड करण्यात आली. या भूमिकेसाठी लागणारी तिची मेहनत छावा चित्रपटात दिसून आली. अशा छोट्या छोट्या भूमिकेतूनच हे कलाकार पुढे जाऊन अभिनयाची उंची गाठतात.