‘पैसे मिळावेत म्हणून ४५०० रुपये भरले’ आपली फसवणूक होतेय हे उशिरा लक्षात मी केलेल्या या चुका तुम्ही करू नका
अंकिता वालावलकर हिने नवीन वर्षाची सुरुवात महागडी ऑडी गाडी खरेदी करून केली. पण हे मोठं यश मिळवण्यासाठी तिला अनेक अपयश पचवावे लागले होते. सुरुवातीला अंकिता सिव्हिल इंजिनिअर म्हणून मुंबईत आली तेव्हा तिला १३ हजार रुपये पगार होता. पण अधिकचे पैसे मिळवण्यासाठी ती धडपड करू लागली. तिने ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका असे म्हणताना ती स्पष्टीकरण देते की, “मी मुंबईत आले तेव्हा आणखी पैसे कमवायचे म्हणून एके ठिकाणी ४५०० हजार रुपये डिपॉजीट म्हणून भरले. त्याबदल्यात ती लोकं एका पुस्तकाची जवळपास ५० पानं कॅपिटल अक्षरात लिहून आणायला सांगायची. A4 साईजच्या पांढऱ्या कागदावर ते कॅपिटलमध्ये लिहायला सांगायचे.
ज्याचे मला आठवड्याने ४० ते ५० हजार रुपये मिळणार असे म्हटले गेले. सगळं एकसारखं कॅपिटलमध्ये व्यवस्थित लिहून द्यायचं असल्याने रोजचे ८ तास त्यात जायचे. शिवाय नोकरीही होतीच. एका आठवड्यात मी ते काम पूर्ण करून त्यांच्याकडे द्यायला गेले. तेव्हा त्यांनी ६ चुका माफ असतात पण अधिकची एकच चूक ते लक्षात आणून द्यायचे. त्यामुळे केलेली मेहनत वाया जायची. पण तरीही मी पैसे मिळण्याच्या आशेने दोन तीन वेळा डिपॉजीट भरत गेले, मैत्रिणींनाही कामाची गरज होती त्यांनाही ते सांगितलं. पण अशाने आपली फसवणूक होतेय हे उशिरा लक्षात यायला लागलं. पुढे कामाच्या शोधात तर होतेच तेव्हा ‘ऑनलाइन कॅप्चा लिहून पाठवायचा’ असं काम असल्याचं कळलं. जे तुम्ही तुमच्या आई बहीणिकडूनही लिहून पाठवू शकता असं ते काम होतं. त्यामुळे मी डिपॉजीट म्हणून ६,५०० रुपये भरले.
पण त्यातही त्यांची जी वेबसाईट होती ती सुरुवातीला दोन दिवस चांगली चालली आणि नंतर नंतर तर सतत बंद असायची. त्यामुळे ते काम करताही येत नव्हतं. तुमच्याच नेटचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून ते मलाच दोष द्यायचे. पुढे लक्षात आलं की हे असे पैसे भरून जास्तीचे पैसे मिळत नसतात. तुम्ही कष्टच केलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला त्याचा मोबदला मिळतो. मुंबईत माझ्यासारखे रोज कितीतरी लोक असे पैसे भरून काम मिळवतात. त्यामुळे असं काम देणाऱ्या लोकांकडे हजारोने पैसा गोळा होतो. या चुकातूनच मी शिकत गेले आणि कष्टाशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाली.”