धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अनेक आजार व्याधी जडलेले पहायला मिळतात. पण या सर्वांवर खात्रीशीर कुठे इलाज होईल की नाही याची शाश्वती दिली जात नाही. अमुक अमुक डॉक्टर यावर योग्य उपचार करू शकतो अशा ऐकीव माहितीवर तुम्ही विश्वास ठेवून उपचार करता. पण आता अवधूत गुप्तेने एक खात्रीशीर डॉक्टरचीच ओळख त्याच्या चाहत्यांना करून दिली आहे. डॉ अक्षय गुप्ते हा अवधूतचा चुलत भाऊ न्यूरोसर्वजन असून अमेरिकेत त्याने १२ वर्ष सेवा पुरवली आहे. मेंदू आणि मणक्याच्या सर्जरीसाठी तो ओळखला जातो. आता भारतातच त्याने स्थयिक होण्याचा निर्णय घेतला असून कोथरूड भागात त्याने स्वतःची फर्म उभारली आहे. याबद्दल अवधूत म्हणतो की, “हा माझा सख्खा आणि एकुलता एक चुलत भाऊ डॉ. अक्षय गुप्ते. हो! हो! तुमचं बरोबर आहे. उजवीकडून तो टायगर श्रॉफ सारखा.. पण थोडा जास्त आणि डावीकडून हृतिक रौशन सारखा.. पण खूप जास्त हॅंडसम दिसतो! दुर्दैवाने मी निर्माता-दिग्दर्शक होण्याआधीच तो MBBS पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला निघून गेला.. नाही तर ‘झेंडा‘ मधल्या सिद्धार्थच्या जागी किंवा ‘भटिंडा‘ मधल्या अभिजीत च्या जागी हाच दिसला असता! (सिद्धू-अभी.. चिडायचं नै हं!) पण, कदाचित आई एकविरेनेच त्याच्यासाठी खूप वेगळी आणि खूप मोठी योजना ठरवली होती.
म्हणूनच..जवळपास एका तपाच्या तपस्येनंतर अमेरिकेतुनच शल्यचिकित्सेचा अभ्यास करून आणि संशोधन करून तो पारंगत न्यूरोसर्जन #neurosurgeon म्हणून टेक्सास मधील “एल पासो” ह्या शहरात स्थायिक झाला. मग, काही वर्षांनी भारतात परत येऊन आपल्या लहानपणीच्या प्रेमाशी, म्हणजेच ‘रुमा‘ नावाच्या मराठी मुलीशी लग्न करून तिला घेऊन परत अमेरिकेला गेला. त्याला दोन गोड मुली देखील झाल्या आणि तेथील वास्तव्याच्या काळामध्ये अनेक भारतीयांप्रमाणेच तो “कधी ना कधीतरी आम्हाला भारतात परत यायचंच आहे” असं म्हणत राहीला. परंतु, एवढ्या मोठ्या सर्जनला मिळणारा एवढा मोठा पैसा, मान मरातब आणि अमेरिकेतील सुख सोयी पाहता तो परत येईल असं आम्हा कुटुंबीयांना कधीच वाटलं नाही आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर, त्याने परत यावं अशी मनापासून आमची देखील फार इच्छा नव्हती. परंतु, मागील वर्षी त्याने ठरवल्याप्रमाणे तो खरोखरच भारतात परत आला.. ते म्हणजे केवळ आपल्या मातृभूमीवरील, मातृभाषेवरील, महाराष्ट्रावरील आणि विशेषतः पुण्यावरील प्रेमामुळे.
निर्णय फारच मोठा आणि जोखिमेचा होता! परंतु, आज मात्र त्याची स्वप्नपूर्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आई एकविरेच्या आशीर्वादाने त्याने “एकविरा न्युरो” नावाने स्वतःची कन्सल्टिंग फर्म कोथरूड मधील सिटी प्राईड थेटर च्या समोरील नवीन उभ्या राहिलेल्या GKK संकुलामध्ये चालू केली आहे. खरंतर तुमच्यापैकी कुणावरच त्याच्याकडे मदतीसाठी जायची वेळ न येवो! परंतु, दुर्दैवाने तुमच्या आजूबाजूच्या, ओळखीच्या कुणावर जर मेंदू किंवा मणक्याच्या सर्जरीची वेळ आलीच .. तर केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट न्यूरोसर्जनस् च्या फळी मधील एक सर्जन, हा आपला हक्काचा मराठी मुलगा आहे आणि आता तो आपल्या पुण्यामध्ये आहे हे विसरू नका! बाकी.. आई एकविरेचे आणि तुमचे आशीर्वाद हे जसे माझ्या पाठीशी कायम असतात, तसेच ते अक्षयाचाही पाठीशी कायम असतील.. ह्याची मला खात्री आहे! धन्यवाद!!