झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. श्रीनू, ओवी, नीरज आणि निशी ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यात श्रीनूची भूमिका निभावणारा अभिनेता अभिषेक गावकर लवकरच विवाहबद्ध होणार आहे. डिजिटल क्रिएटर असलेल्या सोनाली गुरवसोबत अभिषेकने गुढी पाडव्याच्या दिवशी साखरपुडा केला होता. तर उद्या रविवारी या दोघांचा लग्नसोहळा थाटात पार पडणार आहे. काल शुक्रवारी सोनाली आणि अभिषेकच्या मेंदीचा सोहळा पार पडला. यावेळी अभिषेकने मोरपंखी रंगाचा कुर्ता परिधान केला तर सोनालीने मेंदीसाठी पिवळ्या रंगाच्या थ्रिपिसची निवड केली.
सोनाली अभिषेकची मेंदी असे कॅप्शन देऊन त्यांनी या सोहळ्याचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अभिषेक गावकर कॉलेजमध्ये असतानाच नाटकातून काम करत असे. परळ येथील महर्षी दयानंद हे त्याचे कॉलेज. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधुन तो नाटकाचे लेखन ,अभिनय तसेच दिग्दर्शन करू लागला होता. ‘ब्रह्मास्त्र’ या एकांकिकेने त्याला प्रकाशझोतात आणले होते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या पर्वात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. मालिकेत काम करत असतानाच तो प्रल्हाद कुडतरकला मालिकेचे लेखन करण्यास साहाय्य करत होता. हंडरेड डेज, माझी माणसं, सुख म्हणजे नक्की काय असतं अशा मालिकांमधुन त्याने विविधांगी भूमिका साकारल्या.
सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून अभिषेकला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. मालिकेत तो श्रीनिवास सावंत ही भूमिका साकारत होता. अभिषेक रील स्टार असलेल्या सोनाली गुरवच्या प्रेमात पडला होता हे अगोदरच त्यांनी जाहीर केले होते. हे दोघेही गेली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण आता हे कपल लवकरच त्यांच्या चाहत्यांना लग्नबांधनात अडकताना दिसणार आहे.