मराठी सृष्टीत लग्न सोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. दिवाळीनंतर कलाकारांची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. नुकतेच मालिका नाट्य अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे हिचे कोल्हापूरमध्ये मोठ्या थाटात लग्न पार पडले आहे. १० नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या शिंदे हिने अभिनेता वैभव राजेंद्र सोबत हे लग्न केले आहे. ऐश्वर्या आणि वैभव दोघेही मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. नाटकपासून या दोघांची ओळख होती. पुढे या मैत्रीचे प्रेमात आणि आता लग्नबांधनात रूपांतर झालेले पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्या शिंदे हिने भरत जाधव यांच्या पुन्हा सही रे सही नाटकात महत्वाची भूमिका साकारली होती. यानाटकामुळे ती मालिकेतही झळकली होती. पाणी, राजा राणी ची गं जोडी, अशा प्रोजेक्टमध्येही ती पाहायला मिळाली होती. तर वैभव राजेंद्र हाही उत्तम अभिनेता असून मालिकेत त्याने बहुतेक वेळेला खलनायकाच्या भूमिका रंगवल्या आहेत. जय भवानी जय शिवाजी, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, बॉस माझी लाडाची, कुण्या राजाची गं तू राणी, लंपन तसेच आदिपुरुष या बॉलिवूड चित्रपटातही तो झळकला आहे.
गेली अनेक वर्षे वैभवने त्याच्या अभिनयाने मराठी सृष्टीत स्थान मिळवलेले आहे. या यशामागे तो त्याची मेहनत आणि ऐश्वर्याचे प्रोत्साहन असल्याचे तो प्रामाणिकपणे सांगतो. कोल्हापूर येथे हुमा ऍग्री टुरिसम असलेल्या आमराई मध्ये ऐश्वर्या आणि वैभवने ही लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या लग्नाला मित्रमंडळी, नातेवाईक आणि मराठी सृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली होती. वैभव आणि ऐश्वर्या शिंदे दोघांनाही आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा!.