येत्या काही दिवसांत मराठी सृष्टीतील कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. त्यात शिवा मालिकेतील अभिनेता शाल्व किंजवडेकर येत्या ९ डिसेंबर २०२४ रोजी फॅशन डिझाइनर असलेल्या गर्लफ्रेंड श्रेया दफळापूरकर सोबत लग्न करणार आहे. कालच श्रेया आणि शाल्वचे पहिले केळवण पार पडले. तर लवकरच मोठ्या पडद्यावरची नायिका म्हणजेच अभिनेत्री हेमल इंगळे हिच्याही लग्नाचा बार उडणार आहे. हेमल इंगळे हिने नुकतेच तिच्या मैत्रिणींसह बॅचलर पार्टी साजरी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच तिची लग्नाची लगबग पाहायला मिळणार आहे.
ऑगस्ट महिन्यातच हेमलने रौनक चोरडिया या तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या साखरपुड्याची बातमी शेअर केली होती. आता काही दिवसातच त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. हेमल ही मूळची कोल्हापूरची आहे, सचिन पिळगावकर यांच्या अशी ही आशिकी या मराठी चित्रपटातून ती मुख्य भूमिकेत झळकली होती. आता सचिन पिळगावकर यांच्याच नवरा माझा नवसाचा २ चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना तिला मॉडेलिंगचे वेध लागले होते. याचदरम्यान तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग दर्शवला. मिस युनिव्हर्सिटी इंडिया २०१५, मिस अर्थ इंडिया फायर २०१६ आणि मिस इंडिया एक्सक्झिट-क्वीन २०२७ या सौंदर्य स्पर्धा तिने जिंकल्या आहेत.
हुशारु हा तिने अभिनित केलेला पहिला तेलगू चित्रपट ठरला. त्यानंतर सचिन पिळगावकर यांनी अभिनय बेर्डे सोबत ‘अशी ही आशिकी’ मध्ये तिला मुख्य भूमिका देऊ केली. रूपनगर के चिते, उनाड अशा चित्रपटात ती झळकली आहे. हेमल इंगळे आणि रौनक चोरडिया हे दोघेही कोल्हापूरचे आहेत त्यामुळे हे लग्न कुठे पार पडणार याचीही तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. दोघांच्या मेंदी, हळदीचा सोहळा खूप खास असणार हे वेगळे सांगायला नको.