गेले काही दिवस दुनियादारी चित्रपट फेम अभिनेते सुशांत शेलार यांची खालावलेली तब्येत पाहून अनेकांनी काळजी व्यक्त केली होती. एवढा बारीक का झालास?…काही आजारपण आहे का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना त्याची तब्येत पाहून पडले होते. मात्र आता नुकतेच सुशांत शेलारने त्याच्या तब्येत खलावण्यामागचे कारण सांगितले आहे. सुशांत शेलार हा सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे अनेकदा तो मिडियासमोर येताना दिसतो. अशातच त्याला त्याच्या प्रकृतीबाबत विचरण्यात आलं.
तेव्हा तो म्हणतो की, “सगळ्यात अगोदर मी माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी माझ्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. माझी तब्येत बरी व्हावी म्हणून आशीर्वाद दिले त्यांचेही आभार. सुदैवाने स्वामींच्या कृपेने मला कुठलाही आजार झालेला नाही. मी रानटी नावाची फिल्म करतोय जी २२ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटासाठी मी वजन घटवलं होतं. डॉ जयेश जाधव यांच्या सल्ल्यानुसार डाएट केलं आणी बारीक झालो. पण काही महिन्यांपूर्वी मला वारंवार फूड इन्फेक्शन होत होतं. त्यामुळे अजून वजन घटलं. मी टेस्ट केली तेव्हा ऍलर्जी असल्याचे निदान झाले. ज्यात गहू, मैदा, ब्रेड, बटाटा असे काही पदार्थ खाल्ल्यानंतर मला फूड ऍलर्जी झाली म्हणून गेली काही महिने मला फूड पॉइजनिंग झालं. त्यामुळे माझं वजन अजून घटलं पण आता माझी तब्येत छान आहे स्वामींच्या कृपेने मला कुठलाही गंभीर आजार नाही. पण तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो. समाजात जसं वजन वाढतंय तसं शारीरिक वजनही वाढेल.”….असे म्हणत सुशांतने हा खुलासा केला आहे.
सुशांत गेली दोन दशकाहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम करतो आहे. देऊळ बंद, दुनियादारी, मोकळा श्वास, अंड्या चा फंडा, क्लासमेट्स, मॅटर, विजेता या आणि अशा कितीतरी चित्रपटातून सुशांतने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. सुशांत शेलार हा गेली काही वर्षे अभिनय क्षेत्रापासून दूर आहे पण असे असले तरी तो राजकारणाची धुरा सांभाळताना दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाच्या चित्रपट सेनेचा तो अध्यक्ष आहे. या क्षेत्रात व्यस्त असताना तो त्याच्या कार्याची माहिती सोशल मीडियावर कायम देत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर तो नेहमीच सक्रिय असतो.