news

म्हणून प्रसिद्धीच्या झोतात असताना देखील अष्टविनायक चित्रपटानंतर अभिनयातून घेतली होती एक्झिट

‘अष्टविनायक’ हा चित्रपट आणि त्यातील अजरामर गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसतात. या चित्रपटामुळे सचिन पिळगावकर यांना मराठी सृष्टीचा नायक म्हणून ओळख मिळाली होती. खरं तर शरद पिळगावकर यांची इच्छा म्हणूनच त्यांनी मराठी सृष्टीत नायक म्हणून पदार्पण केले होते. महत्वाचं म्हणजे चित्रपटाची नायिका वंदना पंडित यांना या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली होती. पण या चित्रपटानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातूनच काढता पाय घेतला होता. मुक्ता हा चित्रपट केल्यानंतर त्या तब्बल ४० वर्षांनी माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या मालिकेत झळकल्या होत्या. इतक्या वर्षानंतर वंदना पंडित यांना छोट्या पडद्यावर पाहून सगळ्यांना सुखद धक्काच बसला होता. पण इतकी वर्षे त्या अभिनय क्षेत्रापासून दूर का राहिल्या त्यालाही एक खास कारण होते.

athavinayak movie actress vandana pandit ana sachin pilgaonkar
athavinayak movie actress vandana pandit ana sachin pilgaonkar

वंदना पंडित यांना लहानपणी संगीताची आवड होती. त्यांची बहीण बकुल पंडित या आज मोठ्या गायिका आहेत. त्यामुळे लहानपणीच त्यांच्यावर गाण्याचे संस्कार घडत गेले. गोकुळचा चोर या संगीत नाटकातून त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. पुढे नाटकातून काम करत असताना दूरदर्शनच्या मालिकेत त्यांना झळकण्याची संधी मिळाली. ही मालिका सचिन पिळगावकर यांच्या आईने पाहिली तेव्हा अष्टविनायक चित्रपटासाठी त्यांनी वंदना यांचे नाव सुचवले. त्यावेळी वंदना पंडित या १७ ते १८ वर्षांच्या होत्या. अष्टविनायक चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. अगदी मराठी, हिंदी चित्रपटाच्या त्यांना ऑफर येऊ लागल्या. पण बऱ्याच चित्रपटासाठी वेळ खूप लागणार असल्याने त्यांनी काढता पाय घेतला. याचदरम्यान त्यांचे लग्न ही होणार होते. वंदना पंडित यांनी मित्र संजीव सेठ सोबत प्रेम विवाह केला. गुजराती कुटुंबात जाणार असल्याने अभिनयापेक्षा घरची जबाबदारी सांभाळणेच त्यांनी पसंत केले होते.

vandana pandit in mazya navryachi bayko serial
vandana pandit in mazya navryachi bayko serial

फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना बीएमसीसी कॉलेजची मुलं तिथे मुलींना बघायला यायची. त्यात संजीव सेठ यांना वंदना आवडल्या आणि त्यांनी डायरेक्ट लग्नाचीच मागणी घातली. तेव्हा त्यांचा हा सरळ स्वभाव पाहून वंदना पंडित यांनीही लग्नाला होकार दिला. लग्नानंतर अभिनय क्षेत्रात काम करायचं नाही हा वंदनाजींचा वैयक्तिक निर्णय असल्याने त्यांनी तो जबाबदारीने पाळला. जाई आणि ईश्वरी अशा त्यांना दोन मुली आहेत. संजीव यांच्या जाण्याने वंदनाजी खचल्या पण दहा वर्षानंतर मुलींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात दाखल झाल्या. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने पुन्हा त्यांना प्रकाशझोतात आणले. दरम्यान मालिका आणि चित्रपट अशा माध्यमातून त्या प्रेक्षकांसमोर आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button