कॅलिफोर्निया फ्रांसमध्ये मराठी गाण्याचा डंका…रत्नागिरीच्या मराठमोळ्या तरुणाचं होतंय कौतुक
सध्याच्या काळात तरुणाईकडून रॅप सॉंगला चांगली पसंती मिळू लागली आहे. अगदीच पाहायला गेलं तर चित्रपटातही अशा गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते आहे. अशाच एका मराठी रॅप सॉंगचा जगभरात डंका वाजलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत तुम्ही सोशल मीडियावर “तांबडी चामडी चमकते उन्हात, लका..लका…लका” हे रॅप सॉंग ऐकलं असेल किंवा त्यावर रिल्स बनवलेले तुम्ही पाहिले असतील. याच मराठी गाण्याची दखल “इलेक्ट्रॉनिक म्युजिक” कडून घेण्यात आली आहे. स्पिनिंग रेकॉर्डवर साइन केलेले पहिलं मराठी गाणं म्हणून EDM कडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. जगभरातील नाईटक्लबमध्ये या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.
कॅलिफोर्निया ते फ्रान्सच्या क्लबमध्ये या मराठी गाण्यावर तरुणाई ठेका धडताना दिसत आहे. तांबडी चामडी चमकते…या रॅप सॉंगला मिळत असलेला हा प्रतिदास पाहून येत्या २५ ऑगस्टला हेच रॅप सॉंग एका व्हिडिओच्या मधयामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं कोणी लिहिलं या गाण्यामागची हिस्ट्री नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात. श्रेयस सागवेकर या मराठमोळ्या तरुणाने हे रॅप सॉंग लिहिलं आहे. श्रेयस सागवेकर हा मूळचा रत्नागिरीचा. शिक्षण आणि करिअरसाठी तो मुंबई , पुण्यात राहिला. सध्या तो पुण्यातच वास्तव्यास आहे. श्रेयसला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. अर्थात आजोबांमुळे त्याला ही आवड निर्माण झाली होती. श्रेयसच्या आजोबांना भक्तीगीतं आवडायची. हार्मोनियम, तबला अशी वाद्य तो लहानपणीच वाजवायला शिकला होता. पुढे पारंपरिक संगीत आणि पाश्चिमात्य संगीतात त्याने ही कला जोपासली.
रॅपर, म्युजिक प्रोड्युसर, रेकॉर्डिंग आर्टिस्ट अशा जबाबदाऱ्या सांभाळत तो संगीत क्षेत्रात कमाल घडवून आणत आहे. त्याने लिहिलेल्या रॅप सॉंगला चांगली पसंती देखील मिळत आहे. पण तांबडी चामडी..या रॅप सॉंगमुळे श्रेयस प्रकाशझोतात आला. हे गाणं लिहिल्यानंतर Kratexmusic ची त्याला मोठी साथ मिळाली. आज त्यांनी बनवलेल्या गाण्याला जगभरात पसंती मिळते आहे. मराठी गाण्याला नाईटक्लबमध्ये दर्जा मिळवून देण्याचे काम श्रेयस सागवेकरने केले आहे. त्यामुळे त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.