मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळवत आहे. सहभागी झालेल्या सोशल मीडिया स्टारमुळे हा शो पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे साहजिकच बिग बॉसचा टीआरपी वाढला आहे. टीव्ही माध्यमातून हा शो टीआरपीच्या स्पर्धेत १५ व्या स्थानावर आहे तर ऑनलाइन टीआरपीमध्ये ४ थ्या क्रमांकावर या शोने मजल मारली आहे. सूरज, डीपी आणि अंकिता वालावलकर यांच्यामुळे बिग बॉसच्या शोचा टीआरपी वाढला असे म्हटले जात आहे. बिग बॉसचा शो ज्याला कळला तो या शोचा फॅन होतो असे बोलले जाते. पण १०० दिवस हे सदस्य बिग बॉसच्या घरात राहून नेमकं काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्ही जर बिग बॉसचं घर पाहिलं असेल तर ते सगळ्या बाजूने बंदिस्त आहे.
वरूनही त्याला छप्पर घालण्यात आलेलं आहे . त्यामुळे या बंदिस्त घरात १०० दिवस राहणं हे थोडं कठीणच आहे. पण वेगवेगळ्या टास्कमुळे या सदस्यांचा थोडा तरी वेळ सत्कारणी लागतो. पण मधल्या काळात कोणी झोपू नये म्हणून बिग बॉस तशी काळजी घेतो. नुसते डोळे झाकलेले जरी दिसले तरी बिग बॉसच्या घरातला कोंबडा मोठ्याने ओरडतो. पण असेही या घरात वेळ घालवण्यासाठी नेमकं काय केलं जात असेल या प्रश्नाचे उत्तर बिग बॉसचाच सदस्य आरोह वेलणकर याने दिलेलं पाहायला मिळत आहे. आरोह वेलणकर हा मराठी बिग बॉसच्या २ सिजनमध्ये वाईल्डकार्ड एन्ट्री म्हणून आला होता. गेल्या वर्षीच्या ४ थ्या सिजनमध्येही तो काही दिवस या घरात दिसला.
आरोहने बिग बॉचयस घरातील अनुभव घेतला आहे. तो या घरात वेळ कसा घालवत होता ते नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं आहे. तो म्हणतो की” बिग बॉसच्या घरात वेळ जावा म्हणून पुस्तकं अलाऊड नव्हती पेन पेन्सिल असं तिथे काहीच दिलं जात नसायचा. त्यामुळे शेवटी शेवटी आम्ही वेळ घालवण्यासाठी बिग बॉसच्या घरात डॉक्टरांकडून जे प्रिस्क्रिप्शन मिळतं त्यावर काजल पेन्सिलने लीहीत बसायचो. मुली मेकअपसाठी काजल पेन्सिल घेऊन यायच्या त्याने आम्ही ते लिहीत बसायचो. टिश्यू पेपर वरही लिहायचो. पण बिग बॉस आमच्याकडून ते सगळं घेऊन जायचे. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे पॅकेट्स वरून खालपर्यंत २००- २०० वेळा वाचत बसायचो. “