जगात कुठेही नवरा बायकोच्या नात्यात आलेला ३ रा व्यक्ती हा …म्हणून मालिकेत हाताळले जातात असे विषय
आयुष्यात प्रत्येकाने कधी ना कधी टीव्हीवरच्या मालिका पाहिलेल्या असतील. मालिका न पाहणारा व्यक्ती क्वचितच कोणी आढळेल. पण गृहिणी आणि घरातील वयोवृद्धांच्या मनोरंजनाचे हे एक मोठे माध्यम मानले जाते. पण सततची कुटनीती आणि विवाहबाह्य संबंधामुळे मालिका नकोशा वाटतात परिणामी या मालिकांना ट्रोल केलं जातं. प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले हिने या मालिकेच्या भावविश्वाचा उलगडा करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ‘टीव्ही मालिका आणि बरंच काही’ अशा आशयाचं पुस्तक मुग्धाने वाचकांच्या भेटीला आणलं आहे. या माध्यमातून मुग्धाने प्रथमच पुस्तक लिहिण्याचे धाडस दाखवले आहे. खरं तर मालिकेसाठी लेखिका होणं हे एक मोठं आव्हानच असतं.
हे काम खूप अवघड आहे कारण या अर्ध्या तासात प्रेक्षकांना टीव्ही समोर खिळवून ठेवण्याचे काम लेखकाला करावं लागतं. याचाच विचार करून मुग्धाने हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. रोजची आव्हानं, पडद्यामागची गणितं उलगडावीत या हेतूने तिने हे पुस्तक लिहिले आहे. मुग्धा गोडबोले गेली अनेक वर्षे मालिका सृष्टीत लेखिका म्हणून काम करते आहे. बहुतेक मालिकेत विवाहबाह्य संबंध दाखवले जातात त्यावरून कित्येकदा लेखकाला ट्रोल केलं जातं. याबद्दल मुग्धा म्हणते की,” जगातील सगळ्या फॅमिलीमध्ये लोकांना असे विषय बघायला आवडतात. कारण त्यांच्या दृष्टीने ते इंटरेस्टिंग असतात. कुठल्याही एका वाहिनीवर जी मालिका दिसत असते ती मुंबईतल्या मोठ्या घरातल्या टिव्हीमध्येही दिसते आणि खेड्यातल्या टिव्हीवरही दिसत असते.
त्यामुळे कुठल्याही मालिकेचा एक ‘लसावी’ काढला जातो आणि म्हणून ज्यांना टीआरपी खूप मिळतो असे विषय जे बऱ्यापैकी जागतिक दृष्टीने इंटरेस्टिंग वाटणारे विषय असतात ते थोडक्यात म्हणजे ‘विवाहबाह्य संबंध’. नेहमी असं बोललं जातं की मराठी मालिकांमध्ये असे विवाहबाह्य संबंध का दाखवले जातात?. पण ते दिसतात कारण जगातल्या कुठल्याही भाषेत , कुठल्याही कुटुंब व्यवस्थेत नवरा बायकोच्या नात्यात आलेला तिसरा व्यक्ती हे इमोशनली त्रासदायकच असतात.”