मराठी बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी सर्वांवर वर्चस्व गाजवू पाहत आहे. पहिल्याच दिवशी मेकअपवरून निक्की तांबोळी हिचं वर्षा उसगावकर यांच्यासोबत वाद झालेला पाहायला मिळाला. सगळे बिग बॉसच्या सांगण्यावरून समोर आलेले असताना वर्षा उसगावकर मेकअप करायला थांबल्या होत्या. बिग बॉस सुद्धा त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. त्यात निक्की तांबोळीने हात धुवून घेतलेला पाहायला मिळाला. त्यानंतर अंकिता वालावलकर हिच्यावर देखील निक्की चिडलेली पाहायला मिळाली. अर्थात हा वाद तिने समोरासमोर केला नसला तरी तिच्या वागण्याची तक्रार जान्हवी किल्लेकर जवळ केली होती. पण आता नीक्की तांबोळी पुन्हा एकदा वर्षा उसगावकर यांच्यावर चिडलेली पाहायला मिळाली. वर्षा उसगावकर झोपल्याने बिग बॉसने सगळ्यांचे बेड काढून घेतले आहेत. आता बेडवर झोपायला मिळणार नसल्याची शिक्षा घरातील सगळ्या सदस्यांना भोगावी लागणार आहे.
यासंदर्भात ‘चुकून झालं’ असं म्हणत वर्षा उसगावकर यांनी बिग बॉसची माफी सुद्धा मागितली, पण यावरून निक्की तांबोळी वर्षा उसगावकर यांना जबाबदार धरून त्यांना वाटेल ते बोलू लागली. ” पण आम्हाला भोगावं लागतंय, तुमच्यामुळे आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय , तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती जेव्हा झोपले होते तुम्ही?” असे म्हणत निक्कीने वर्षा उसगावकर यांना चांगलेच धारेवर धरले. वर्षा उसगावकर निक्कीला शांत करण्याचा तिला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र तिनेच वर्षा उसगावकर यांना ‘कीप क्वाईट’ म्हणत गप्प बसवले. अर्थात या शिक्षेमुळे निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यात चांगलाच वाद झालेला पाहायला मिळतो आहे. यावरून आता निक्की तांबोळी प्रेक्षकांच्याच टीकेला सामोरी जात आहे. वर्षा उसगावकर या सिनिअर आहेत त्यांच्याशी वाद घालून तू त्यांचा अपमान करत आहेस असेच तिच्याबद्दल बोलले जात आहे.
निक्की तांबोळी ही फुटेज मिळवायला असं करत असल्याचेही बोलले जात आहे. सतत कोणाशीतरी वाद घालून तिला चर्चेत राहायचं आहे. पण असे करताना तिने वर्षा उसगावकर यांच्या वयाचा मान ठेवायला हवा अशा शब्दांत तिच्यावर टीका करण्यात येऊ लागली आहे. अर्थात बिग बॉसचा शो म्हणजे वाद हे एक ठरलेलं गणित आहे. पण पहिल्याच दिवशी वाद घालून निक्की तांबोळीने या शोचा खरा अर्थ सगळ्यांना पटवून दिला आहे. अंकिता वालावलकर , वर्षा उसगावकर यांना ती टार्गेट करत आहे. त्यामुळे विकेंड वॉरमध्ये निक्कीला रितेश देशमुख कडून ओरडा मिळणार हे आता नक्की आहे.