‘लाडकी बहीण’ योजनेनंतर ‘लाडका भाऊ’ योजनेची तयारी…१२ वी ग्रॅज्युएट डिप्लोमा धारकांना मिळणार वेगवेगळे मानधन
आज पंढरपूर येथे विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या तरुणांसाठी एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्राच्या तरुणांसाठी खास बनला आहे. लाडकी बहीण या योजनेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतून दर महिन्याला २५ ते ६५ वयोगटातील महिलांना तसेच तरुणींना शासनाकडून १५०० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत. पण एकीकडे ही योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावाचं काय? असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. त्याचं उत्तर नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात दिलं आहे. लाडक्या भावासाठी आम्ही एक योजना सुरू केली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिलेली पाहायला मिळाली. आता या लाडका भाऊ योजनेत कोणाला किती फायदा होणार हेही ततानी जाहीर केले आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे आणि कामाचा तुटवडा यामुळे तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. हाताला काम नसल्याने रोजच्या जगण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. याच तरुणांच्या मदतीला आता शासन धावून आलं आहे. बारावी पास झालेल्या तरुणाला शासनाकडून ६ हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. तर डिप्लोमा धारकांना ८ हजार रुपये आणि डिग्री पास झालेल्या तरुणाला १० हजार रुपये महिन्याला स्टायफंड देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महत्वाचं म्हणजे हा लाडका भाऊ वर्षभर कंपनीत काम करेल त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे यादरम्यान त्या कंपनीत तो ट्रेन होईल. अप्रेंटीशीपचे पैसे शासनातर्फे दिले जातणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कारखाने, उद्योग आणि कंपन्यांत हे युवक एप्रेटिशीप करतील. शासनाकडून त्यांना महिन्याला हा भत्ता दिला जाणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल. दरम्यान लाडकी बहीण योजने अंतर्गत फॉर्म भरताना काही त्रुटी जाणवू लागल्या आहेत त्यामुळे या त्रुटी भरून काढण्याचे काम वेळोवेळी केले जात आहे. काही नियम देखील शिथिल करण्यात आल्याने फॉर्म भरणाऱ्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या यशानंतर लवकरच लाडका भाऊ योजना सुरू केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना एक आशेचा किरण दिसू लागला आहे.