जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा शाही विवाहसोहळा अखेर पार पडला आणि सगळ्यांनी निःश्वास सोडला. अर्थात या लग्नाची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. अंबानी कुटुंबियाने हा सोहळा खास करण्यासाठी परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित केले होते. बॉलिवूडची सगळी मांदियाळीच या लग्नाला हजर राहिलेली पाहायला मिळाली. खेळ, राजकारण, उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनाही या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले. या गर्दीत मराठी कलाकार सुद्धा आपली ओळख मिरवताना पाहायला मिळाले. अनंत आणि राधिकाच्या लग्नात कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. रिटर्न गिफ्ट म्हणून अंबानीने काही सेलिब्रिटींना २ कोटींची घड्याळं गिफ्ट दिली. हा सगळा तामझम संपुष्टात आल्यानंतर नीता अंबानी यांनी मिडियासमोर येऊन सगळ्यांचे आभार मानले.
काही कमीजास्त झालं असेल, नजर चुकीने काही राहून गेलं असेल तर न संकोचता जाहीर माफी देखील मागितली. राधिका आता अंबानी कुटुंबाची सून झाली त्यानंतर ही धावपळ आता कुठेतरी स्थिरावलेली पाहायला मिळाली. पण अशातच सलमान खानने त्याच्या एका पोस्टमध्ये चाहत्यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला सलमान खान उपस्थित होता. अगदी हळदीच्या सोहळ्यात तो नाचताना पाहायला मिळाला. सलमानचे अनंत सोबत एक खास बॉंडिंग पाहायला मिळते. अनंत जे म्हणेल ते सलमान करताना दिसतो. अगदी गाडीवरून फिरवणे असो किंवा एकत्र नाचगाणे असो हे दोघेही बिनधास्तपणे एकमेकांना साथ देत असतात. अशातच सलमानने अनंत आणि राधिकासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आणि त्यात त्याने एक इच्छा बोलून दाखवली आहे. सलमान खानची ही इच्छा नेमकी काय आहे ते त्याच्याच पोस्टमध्ये जाणून घेऊयात.
सलमान खान म्हणतो की, “अनंत आणि राधिका, मिस्टर आणि मिसेस अनंत अंबानी, तुमचे एकमेकांवर आणि एकमेकांच्या कुटुंबावर असलेले प्रेम मी पाहिलंय. विश्वाने तुम्हाला एकत्र केले आहे. तुम्हाला सुखी आणि आरोग्यदायी आयुष्याच्या शुभेच्छा. देव तुम्हा दोघांचे कल्याण करो! जेव्हा तुम्ही पालक व्हाल तेव्हा तुमच्यासोबत डान्स करण्यासाठी मी नक्कीच उत्सुक असेल.” अनंत आणि राधिका लवकरच पालक होवोत आणि तुमच्यासोबत मी पुन्हा एकदा नाचावे अशी सलमानची इच्छा आहे.