कला क्षेत्राच्या जोडीला तुमचा एखादा व्यवसाय असावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. काहींनी त्यांची ही इच्छा पूर्णत्वास आणली आहे. अनेक कलाकार सध्या हॉटेल आणि कपड्यांच्या व्यवसायाला प्राधान्य देत आहेत त्यात आता आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. प्रसिद्ध गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे देखील आता हॉटेल व्यवसायात उतरले आहेत. नुकतेच त्यांनी या व्यवसायाचे उद्घाटनदेखील केलेले आहे. बंगलोर कँटिंगची त्यांनी फ्रेंचायजी घेतली आहे. पुण्यातील सिंहगड परिसरातील खाऊ गल्ली मध्ये त्यांनी हे कँटीन सुरू केले आहे. इथले खास वैशिष्ट्य म्हणजे घी डोसा, हा डोसा खाल्ल्यानंतर सलील कुलकर्णी यांना बंगलोर कँटीन ची फ्रेंचायजी घ्यावी असे सुचले.
खरं तर यामागे त्यांची एक अशी खास आठवण देखील आहे. सलील कुलकर्णी यांच्या वडीलांचे निधन झाले तेव्हा ते खूपच लहान होते. त्यामुळे दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली होती. त्यादरम्यान सलील कुलकर्णी यांच्या आईने नोकरी करून दोन्ही मुलांना लहानाचे मोठे केले. जेव्हा कधी ते हॉटेलिंगला जायचे तेव्हा त्यांच्या आई सायकलवर त्यांना घेऊन जायच्या. हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात कमी किमतीचा म्हणजेच साधा डोसा खायचा ते आग्रह करायचे. या डोश्याची आजही त्यांना आठवण आहे त्याचमुळे जेव्हा बंगलोर कँटीनची फ्रेंचायजी घेतली तेव्हा या हॉटेलचे उद्घाटन त्यांनी त्यांच्या आईच्याच हस्ते केले.
सिंहगडमधील खाऊ गल्ली येथे त्यांनी ही फ्रेंचायजी सुरू केली आहे. यावेळी सलील कुलकर्णी यांची बहीण आसावरी रानडे यादेखील उपस्थित होत्या. दरम्यान या व्यवसायात पाऊल टाकण्या सोबतच त्यांनी आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लवकरच सलील कुलकर्णी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. एकदा काय झालं या चित्रपटानंतर ते आता आणखी एक चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटासंबंधीत अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सलील कुलकर्णी हा दुहेरी आनंद चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहेत. या नवीन प्रोजेक्टनिमित्त आणि हॉटेल व्यवसायातील पदार्पणासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.