अशी आहे अवंतिका मालिकेतील वृंदाची लव्हस्टोरी… पती आहेत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील मोठं नाव
एखादं काम हे तुमच्या आवडीचं असतं आणि त्याचाच डोक्यात सतत विचार सुरू असतो तेव्हा मात्र त्यातून अद्भुत काहीतरी कमालीचं घडून जातं. असाच काहीसा प्रकार अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, नाटककार गजेंद्र अहिरे यांच्या बाबतीत झालं आहे. खरं तर कलाक्षेत्राला झोकून देणाऱ्या कलावंतांपैकी गजेंद्र अहिरे हे एक नाव आवर्जून घ्यावं लागेल. कारण दिवसाचे २४ तास आणि ३६५ दिवस सतत सिनेमाने झपाटलेल्या या कलावंताने अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. असाधरण व्यक्तिमत्व असलेल्या गजेंद्र अहिरे यांच्याबद्दल आज अशाच काही खास गोष्टी जाणून घेऊयात. अनवट, अनुमती, वासुदेव बळवंत फडके, टुरिंग टॉकीज, नीळकंठ मास्तर, पिपाणी, शेवरी, द सायलेन्स अशा अनेक दर्जेदार चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केलं. आपल्याला या क्षेत्रात यायचंय हे त्यांचं लहानपणीच ठरलेलं होतं.
चार भावंड आई वडील असं त्यांचं कुटुंब होतं. लहान असतानाच ते चाळीतल्या मुलांसोबत खेळायला जायचे तेव्हा चित्रपटाचे कथानक असावे असे खेळ ते खेळायचे. रोज नवनवीन कथा सुचवून ते त्या खेळात हिरो बनून वावरायचे. शाळेतही त्यांची सतत बडबड सुरू असायची. एकदा शाळेतल्या शिक्षिकेने त्यांची ही सततची बडबड ऐकून वर्गासमोर उभं केलं आणि तुला जे हवंय ते बोल म्हणून व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. पुढे रुईया कॉलेजमध्ये असताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नाटक एकांकिकेसाठी ते लेखन करू लागले. सकाळी घर सोडलं की रात्री कोणी हाकलून लावेपर्यंत ते कॉलेज सोडत नसत. कधीकधी तर कॉलेजच्या कट्ट्यावर, फुटपाथवरच ते झोपून जायचे. मित्रांच्या रूमवर जाऊन तिथेच अंघोळ करून पुन्हा कॉलेजमध्ये यायचे. इथेच त्यांना त्यांच्या आयुष्याची जोडीदार मिळाली असं म्हणायला हरकत नाही. वृंदा पेडणेकर हे त्यांचं नाव. वृंदा पेडणेकर या शाळेत असल्यापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायच्या. विद्या पटवर्धन यांच्याकडे त्यांनी नाट्यशिबिर केले तेव्हा त्यांना विद्याताईंनी रुईया कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला दिला. ११ वीत असताना गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेल्या ‘कथा ओल्या मातीची’ या एकांकिकेत त्यांना अभिनयाची संधी मिळाली. त्यावेळी गजेंद्र एमएच्या पहिल्या वर्षात शिकायला होते. त्यानंतर गजेंद्र अहिरे यांनी ‘आईचं घर उन्हाचं’ हे नाटक दिग्दर्शित केलं. वृंदाला त्यांनी हे नाटक बघायला बोलावलं होतं. त्यानंतर रुईया कॉलेजमध्ये असताना एक दिवस गजेंद्र यांनी वृंदाला लेदरची बॅग गिफ्ट दिली.
त्यात डेअरी मिल्कची कॅडबरी, पुस्तक , कॉकी पॉकीची गोष्ट अशी एकांकिकेची एक कॅसेट होती. पण तरीही त्याने आपल्यालाच हे गिफ्ट का दिलं गेलं यावर वृंदा साशंक होत्या. याचदरम्यान गजेंद्र यांचं एकंदरीत वागणं पाहून वृंदा गजेंद्रच्या प्रेमात पडल्या. पण जेव्हा लग्न करायचं ठरलं त्यावेळी ‘मी एका टिपिकल नावऱ्यासारखा नाही, तुला वेळ देता येणार नाही आणि ती तू अपेक्षा ठेवू नये’ अशी अट घालण्यात आली. २५ नोव्हेंबर १९९५ रोजी घरच्यांच्या संमतीने दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर वृंदा पेडणेकर या वृंदा गजेंद्र नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला ताक धिना धीन मध्ये त्या बॅक स्टेजवर राहून असिस्टंट म्हणून काम करू लागल्या त्यानंतर तिथेच त्या आदेश बांदेकरसोबत अँकरिंग करू लागल्या. झाले मोकळे आकाश, सुंबरान, अवंतिका या मालिकेतून त्या अभिनेत्री म्हणून समोर आल्या. मधल्या काळात मुलाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. कुण्या राजाची तू गं राणी या मालिकेतून त्यानी पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं. तर लवकरच आणखी काही आगामी प्रोजेक्टमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.