येत्या २६ जुलै रोजी ‘घरत गणपती’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला. तर काल अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून कलाकारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यामुळे घरत गणपती चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू झालेले पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून भूषण प्रधान प्रमुख भूमिका साकारत आहे तर त्याला निकिता दत्ता हिची साथ मिळाली आहे. अश्विनी भावे, अजिंक्य देव, परी तेलंग, शिभंगी गोखले, सुषमा देशपांडे, शुभांगी लाटकर असे बरेचसे जनकार कलाकार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत. लवकरच गणरायाचे आगमन होणार आहे त्यानिमित्ताने एक गणपतीचे वेध लावणारी एक कौटुंबिक भावनिक कथा या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.
पण या चित्रपटात अमराठी नायिकेला संधी देण्यात आल्याने लोकांनी या चित्रपटाविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. मराठी चित्रपट आहे मग तुम्ही मराठी अभिनेत्री का नाही घेतली? असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले आहेत. त्यावर भूषण प्रधानने याला उत्तर देताना म्हटले आहे की, “अरे, मराठी चित्रपटासाठी मराठी अभिनेत्री नाही मिळाली का? असं लोक विचारू लागले. त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की ही एक चित्रपटाची गरज आहे. आणि ते का हे तुम्ही चित्रपट पाहिला की तुम्हाला ते कळेल. निकिता ही उत्तम अभिनेत्री आहे तिने यात खूप छान काम केलेलं आहे. मी जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा आपल्याला माहीत नसतं की कोणकोणते कॅरॅक्टर्स प्ले करणार आहेत.
पण जेव्हा आपण हे इमॅजिन करतो की ह्या पात्राच्या जागी कोण असेल ?. कारण तिचं कॅरॅक्टर ज्या पद्धतीच आहे ती नक्कीच महाराष्ट्रीयन नसेल, मग ती कोण असेल? इतकं ते तंतोतंत जुळून आलं आहे त्यामुळे तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली आहे.” असे भूषण म्हणतो. दरम्यान निकिता दत्ता हिने बॉलिवूड चित्रपटातून वेबसिरीज मधून काम केलेलं आहे. खाकी, रॉकेट गँग, द बिग बुल, कबीर सिंग मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. घरत गणपती या चित्रपटातून निकिता प्रथमच मराठी चित्रपटाची नायिका बनणार आहे. एक अमराठी चेहरा असल्याने तिला काहीसा विरोध दिसत आहे पण ही एक चित्रपटाच्या कथानकाची गरज आहे असे स्पष्टीकरण भूषणने प्रेक्षकांना दिलं आहे.