अभिनेत्री आदिती सारंगधर हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रस्तुती पश्चात आलेल्या डिप्रेशन बद्दल बराचसा उलगडा केला आहे. बाळंतपण झाल्यानंतर तुमचे मित्र मंडळी बाळाची चौकशी करतात पण बाळाला जन्म देणाऱ्या त्या आईची कधीच विचारपूस करत नाही हा तिचा मुद्दा अनेकांना पटला आहे. आई होणं हे एक सोनेरी स्वप्न असते पण त्या कठीण प्रसंगात तुम्हाला जवळच्या व्यक्तींची साथ हवी असते नाहीतर मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार हे एक ठराविक गणित अनेकांच्या बाबतीत घडलेलं आहे. अशा वेळी आदितीला देखील मृत्यूला कवटाळण्याची इच्छा झाली होती. चिडचिडेपणा, अचानक रडू कोसळणे या डिप्रेशनच्या गोष्टी वेळीच लक्षात घेतल्याने आणि त्यावर योग्य ते कौन्सिलिंग केल्याने ती त्या डिप्रेशनमधून बाहेर पडली.
आदिती सारंगधर हिची प्रेग्नन्सीच्या काळात तर अधिक चिडचिड व्हायची. पण बिअर पिली की तिला बरं वाटायचं. अर्थात गरोदरपणात कोणाला कशाचे डोहाळे लागतील हे सांगता येणे कठीण असते. कोणाला सिगरेटच्या वासाची तल्लब लागते, कोणाला माती खावीशी वाटते पण आदीतीला बिअरचे डोहाळे लागले होते असे ती या मुलाखतीत सांगते. ती म्हणते की, “मला प्रेग्नन्सीमध्ये बिअर प्यायचे डोहाळे लागले होते. मी नऊ महिने बिअरच प्यायली होती. या दिवसात मी कधीच भारतीय पद्धतीच जेवण केलं नव्हतं. मी याबाबत डॉक्टरांचा सल्लाही घेतला होता. मी त्याना विचारलं होत की , बिअर पिली नाही की मला खूप कसतरी होतं. मला खूप राग येतो.
तेव्हा मग त्यांनी मला दोन दोन सिप प्यायची परमिशन दिली. मग मी ९ महिने बिअरच पिऊ लागले त्यासोबत सॅलड खायचे. भात वरण असलेलं फोडणीचं काही जरी समोर आलं तरी मी त्यातली एक एक मोहरी काढून टाकायचे, माझ्या घरभर १००- २००- ३०० मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे भारतीय जेवण मी बंद केलं आणि सॅलड सोबत बिअर एवढंच घेऊ लागले”.