का गुजराती लोकं पटपट मोठी होतात….गुजराती कुटूंबाची सून झाल्यावर कांचन अधिकारी यांना आला होता अनुभव
‘दामिनी’ ही मराठी मालिका सृष्टीतील सर्वात लोकप्रिय झालेली आणि तब्बल ८ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी पहिली मराठी मालिका ठरली होती. दुपारी ४.३० वाजता या मालिकेचे प्रसारण होत होते, अवघ्या १३ भागात पूर्ण करायची म्हणून सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून १५०० भागांवर पोहीचली होती. या मालिकेत लक्ष्मीकांत बेर्डेसह मराठी सृष्टीतील जवळपास सर्वच कलाकारांनी काम केले होते. कांचन अधिकारी यांनी या मालिकेची निर्मिती करण्याचे ठरवले होते. पण या मालिकेला एवढा तुफान प्रतिसाद मिळेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. खरं तर कांचन अधिकारी या लग्नानंतर निर्मिती क्षेत्राकडे वळल्या. पूर्वाश्रमीच्या त्या कांचन घारपुरे. मुंबईत बालपण आणि शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. नाटक, मालिका, चित्रपट असा त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास उत्तमरीत्या सुरू होता.
दूरदर्शनच्या अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांना महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. याचदरम्यान दूरदर्शनसाठी काम करत असताना एक दिवस त्यांची निर्माते मार्कंड अधिकारी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी मार्कंड अधिकारी हे बंदिनी मालिकेची निर्मिती करत होते. त्यांच्या मालिकेत आपल्याला काहीतरी काम करता यावे ही कांचन यांची इच्छा होती. पण दोन चार दिवस घरी सोडण्याच्या बहाण्याने मार्कंड अधिकारी यांनी कांचन यांना थेट लग्नाचीच मागणी घातली. १९८९ च्या दरम्यान श्री अधिकारी ब्रदर्स या निर्मिती संस्थेचे सर्वेसर्वा मार्कंड अधिकारीसोबत कांचन यांचे लग्न झाले. एका कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबातून त्या गुजराती कुटुंबात समाविष्ट झाल्या. लग्नानंतर कांचन यांना समजलं की अधिकारी कुटुंबावर कर्जाचा डोंगर आहे. अमृता राव यांच्या युट्युब चॅनलला कांचन अधिकारी यांनी एक मुलाखत दिली होती. याबद्दल त्यांनी इथे एक खुलासा केलेला पाहायला मिळाला.
मालिका क्षेत्रात एक नावाजलेलं नाव म्हणजे श्री अधिकारी ब्रदर्स. खरं तर हा यशाचा प्रवास कसा घडला याबद्दल कांचन म्हणतात की, ” मी त्याच्याशी लग्न केलं तेव्हा मला हे पण माहीत नव्हतं की हे लोकं कर्जात आहेत. मी अधिकारी कुटुंबात सून म्हणून गेले तेव्हा आम्ही ६ जण वन बेडरूम किचनमध्ये राहत होतो. माझे सासू सासरे, मार्कंड मी, हिरेन अधिकारी आणि त्याची बायको. त्यावेळी गौतम अधिकारी याने स्वतःचं एक छोटंसं घर घेतलं होतं. मार्कंडने त्यावेळी पहिली सिरीयल केली होती छुपाछुपी नावाची पण ती कधी आलीच नाही. त्यानंतर मार्कंडनी बंदिनी नावाची सिरीयल केली तेव्हा त्याने राहत्या घरावर कर्ज घेतलं होतं. हे मी माझ्या सासूचा मोठेपणा सांगते की का गुजराती लोकं पटपट मोठी झालेली दिसतात, आपल्याकडे कसं असतं की आपण त्यांना सांगून टाकतो की आता मी तुला शिक्षण दिलंय तू तुझं बघ काय ते…तसं नाही होत त्यांच्याकडे, माझ्या सासूनी राहतं घर लिहून दिलं होतं की हे घे आणि यावर पैसे काढून तू धंदा कर आणि त्यातून तू काहीतरी कमव. इतक्या लेव्हलचा सपोर्ट असतो गुजराती, मारवाडी घरातून.माझी सूनसुद्धा मारवाडी घरातली आहे. आणि कित्येकांना आम्ही पाहिलं आहे.आता चित्र बदललं असेल माहीत नाही पण त्यावेळी असं असायचं की ‘तुझं तू बघ ‘ हा फॅक्टर आहे ना मराठी घरातला तो कुठेतरी बदलला पाहिजे.”