कितीतरी मालिकांसाठी टायटल सॉंग्स गायली पण पैसे नाही मिळाले आणि क्रेडिटही ….मालिकेच्या शीर्षक गीतांवर लोकप्रिय गायिकेची खंत
कित्येक मालिका या त्यांच्या शीर्षक गीतांसाठी ओळखल्या जातात. उदाहरण द्यायचेच झाले तर गोट्या, अभाळमाया, वादळवाट या आणि अशा कितीतरी मालिकांचे शोर्षक गीत आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. पूर्वी हे शीर्षक गीत ऐकण्यासाठी प्रेक्षक टीव्हीसमोर येऊन ठाण मांडून बसत असत. पण हल्लीच्या जमान्यात हा प्रकार सहसा अनुभवायला मिळत नाही. कारण मालिकेचे शीर्षक गीत दाखवण्याऐवजी डायरेक्ट मालिकाच सुरू केल्या जातात. त्यामुळे शीर्षक गीतांना डावललं जातंय अशी एक खंत गायिका प्रियांका बर्वे हिने बोलून दाखवली आहे. आम्ही शीर्षक गीत गातो पण त्याचं साधं क्रेडिटही दिलं जात नाही अशी प्रतिक्रिया प्रियांकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
प्रियांका बर्वे ही मराठी इडस्ट्रीतील एक लोकप्रिय गायिका आहे. मराठी चित्रपट गीतांसह तिने काही हिंदी चित्रपटातही गाणी गायली आहेत. तर अनेक मराठी मालिकांसाठी तिने शीर्षक गीतं गायली आहेत. तू चाल पुढं, स्वामीनी या आणि अशा अनेक गाजलेल्या मालिकेची शीर्षक गीतं गाऊन देखील कित्येकदा मानधन मिळत नाही असे ती सांगते. याबद्दल ती म्हणते की, “आज आम्ही एवढी गाणी गातो, सिरिअल्सची टायटल सॉंगस गातो , मनापासून ती गात असतो.पण कधी कधी त्याचे पैसेही मिळत नाहीत. बऱ्याच फिल्म सॉंगसाठीही मिळत नाही. मी अपेक्षाही करत नाही, कारण फक्त त्याच्यावरच माझं चाललेलं नाहीये. माझे कार्यक्रम असतात, बाकीची कामं असतात. मला गाणं गायला मिळतंय आणि माझ्या नावावर ते गाणं तयार होतंय यामुळे मी जाते.
पण मग आम्ही टायटल सॉंग गातो आणि ते एक दिवसच लागतं. पुढे नंतर ते लागतच नाही कधी , म्हणजे डायरेक्ट सिरीयल चालू होते. टायटल सॉंग लागतच नाही म्हणजे मग असं होतं की ‘ मग का करताय तुम्ही?’ मग ते तुम्हाला युट्युबवर पाहायला मिळतं . पण त्याच्याखाली क्रेडीट्स पण दिलेलं नसतं बऱ्याचदा. तुमचं नाव नसतं, कंपोजरच नाव नसतं , गितकाराचं नाही, त्यामुळे काय होतं की या गोष्टीचं थोडसं वाईट वाटतं की आपण करतो तर मग का करतो. असं खूपदा झालेलं आहे. “