काल २१ एप्रिल रोजी अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने यांचा पुण्यात मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला कन्यादान मालिकेतील कलाकारांनी तसेच हर्षदा खानविलकर, प्रवीण तरडे, ऋतुराज फडके, रमेश परदेशी यांनी आवर्जून हजेरी लावलेली होती. या लग्नानंतर अमृता आता पुण्याची सून झाली असे त्यांच्या बाबतीत बोलले गेले. तर आज प्रसिद्ध अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋजुता धारप यांचाही मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. आज २२ एप्रिल रोजी चेतन आणि ऋजुताने नाशिक येथे हा सोहळा आयोजित केला होता. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून चेतन वडनेरे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला..
याअगोदर त्याने झी मराठीच्या अल्टी पलटी सुमडीत कल्टी मालिकेतून प्रमुख भूमिका साकारली होती त्यानंतर तो काय घडलं त्या रात्री या मालिकेत दिसला तर ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील शशांकच्या भूमिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. तर ऋजुता धारप ही देखील अभिनेत्री आहे. फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेत ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम डान्सर देखील आहे. चेतन वडनेरे हा मूळचा नाशिकचा. नाशिकहून मुंबईला आल्यानंतर त्याला ऋजुताने इथल्या धकाधकीच्या गर्दीत मोठी मदत केली होती. यातूनच दोघांची मैत्री आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघेही अनेकदा एकत्र फिरायला जात असल्याने त्यांच्यात प्रेम आहे अशी चर्चा पाहायला मिळाली. त्याच दरम्यान म्हणजेच डिसेंबर २०२२ मध्ये साखरपुडा करून त्यांनी या चर्चेला दुजोरा दिलेला पाहायला मिळाला.
साखरपुड्यानंतर आता जवळपास दीड वर्षाने या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत कुठेही वाच्यता केली नाही त्यामुळे काही वेळापूर्वी लग्नाचे फोटो शेअर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चेतन वडनेरे आणि ऋजुता धारप यांनी पारंपरिक पद्धतीने हा लग्नसोहळा केला आहे. त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील काही मोजक्या कलाकारांनीच हजेरी लावलेली पाहायला मिळाली. चेतन वडनेरे आणि ऋजुता धारप या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.