मी व माझं कुटुंब प्रचंड ट्रोलिंगचा सामना करतोय…आता तर आम्हाला अफगाणिस्तान नाहीतर पाकिस्तानला राहायला जाण्याचा
ट्रोल होणं या गोष्टी कलाकारांसाठी काही नवीन नाहीत मात्र जर त्या कलाकाराच्या कुटुंबालाच जर असा त्रास सहन करावा लागत असेल तर कुठेतरी त्यांचीही सहनशक्ती संपलेली पाहायला मिळते. असाच काहीसा अनुभव लेखक, अभिनेता चिन्मय मांडलेकर याने गेल्या काही दिवसांपासून घेतला आहे. या ट्रोलिंगला कंटाळून चिन्मयच्या पत्नीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. चिन्मय मांडलेकर याने मराठी मालिका, चित्रपटातून अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. बऱ्याच ऐतिहासिक चित्रपटातून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका मुलाखतीत त्याच्या मुलाचे नाव जहांगीर असल्याचे म्हटले होते. पण तेव्हापासून मुलाच्या नावावरून त्याला ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. जहांगीर नाव ठेवतो आणि छत्रपतींची भूमिका साकारतो, तुझी लायकी नाही अशी त्याच्यावर टीका करण्यात येऊ लागली.
पण यानंतर आता चिन्मयची पत्नी नेहा जोशी ही देखील या ट्रोलिंगचा सामना करत आहे. ‘तुम्ही देश सोडून अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानला जा’ असा मेसेजच एका यूजरने त्यांना काल दिला होता. त्यावर संतापून नेहा जोशी यांनी ‘आम्ही देश सोडून का जाऊ?’ असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. नेहा जोशी या ट्रोलर्सना उत्तर देताना म्हणतात की, ” आम्ही गेले काही दिवस प्रचंड ट्रोल होतोय. का तर ११ वर्षाच्या माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे म्हणून. ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगते की जहांगीर हे पारसी नाव आहे. जे आर डी टाटा यांचंही नाव जहांगीर आहे. आणि या नावाचा अर्थ जगज्जेता असा होतो. या स्वतंत्र भारतात एक स्वतंत्र विचारांचा नागरिक म्हणून आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं आहे. द कश्मीर फाईल्स मध्ये चिन्मयने विरोधी पात्र साकारले त्यावरून लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं. याचमुळे आम्ही आमच्या मुलाचं नाव ठेवलं का अशी आमच्यावर टीका होऊ लागली. पण तुम्हाला सांगते हे नाव हे पात्र साकारण्याच्या खूप अगोदर ठेवण्यात आलं होतं. समोरचा ट्रोल करणारा व्यक्ती लिहिताना याचा विचार करत नाही की वाचणारी व्यक्ती ही काही रोबोट वगैरे नाहीये. तीही एक भावना असलेली माणूसच आहे. आम्हालाही या ट्रोलिंगचा प्रचंड त्रास होतो.
आता तर लोकं आम्हाला देश सोडून अफगाणिस्तान, पाकिस्तानला जायला सांगतात. आम्ही आमचा देश सोडून का जाऊ?. आम्हाला आमच्या मुलांची नावं ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपल्या देशात कितीतरी खेळाडू मुस्लिम आहेत, सुपरस्टार मुस्लिम आहेत. आपणच त्यांना करोडोंचे बिजनेस करून देतो. महाराजांची भूमिका साकारली म्हणून लोक ट्रोल करतात, पण आम्ही उभ्या महाराष्ट्राची जाहीर मागतो की जिरेटोप चढवून आम्ही छत्रपतींची भूमिका साकारली . त्यांचं कार्य खूप मोठं आहे चरित्र खूप मोठं आहे ते आम्ही लोकांपर्यंत नाही पोहोचवू शकलो. माझ्या मुलाच्या नावावरून आम्हाला देश सोडून जा म्हटलं जातं ह्याचं मला फार वाईट वाटलं. पण आता नाही, आम्ही आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे.या व्हीडीओ नंतर ट्रोलिंग थांबणार नाही उलट ते आणखी वाढणार आहे. पण आता मी माझं काम केलं आहे, माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे.”