‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीलाचे वडील चित्रपट निर्माते.. तर आई चक्क बगळे गरुड सरडे यांसारख्या
झी मराठीवर वाहिनीवर गेल्या आठवड्यापासून नवीन मालिका प्रदर्शित झाली आहे ती म्हणजे नवरी मिळे हिटलरला. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत राकेश बापट हा तगडा कलाकार मराठी मालिकेतून प्रथमच छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारत आहे. तर सोबतीला लीला हे पात्र अभिनेत्री वल्लरी विराज साकारत आहे. अभिनेत्री वल्लरी विराज हिने तिच्या अभिनयाने लीला हे पात्र सुंदर वठवलेले पाहायला मिळत आहे. वल्लरी विराज हिने ह्यापूर्वी देखील मराठी तसेच हिंदी मालिकेतून काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कन्नी या चित्रपटात तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. वल्लरीबद्दल आज आपण माहित नसलेल्या खास गोष्टी जाणून घेऊयात..
अभिनेत्री वल्लरी विराजने या अगोदर सोनी टीव्हीवरील अहिल्याबाई होळकर या हिंदी मालिकेत पार्वतीची भूमिका साकारली होती प्रेकांच्या मनात आजही ती भूमिका घर करून आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच वल्लरीने नाटकात कामे केली आहेत विशेष म्हणजे नृत्यातही ती तितकीच निपुण आहे. २०१९ साली सौंदर्य स्पर्धेतील श्रावण क्वीन हा किताबही तिने पटकावला आहे. वल्लरीचे वडील विराज लोंढे प्रसिद्ध चित्रपट निर्माते म्हणून सर्व परिचित आहेतच. नागराज मंजुळे यांच्या नाळ चित्रपटाची त्यांनी निर्माता म्हणून काम केले आहे. सद्याचे गाजत असलेलं नाटक अलीबाबा आणि चाळिशीतले चोर याचे प्रोड्युसर म्हणूनही ते काम पाहत आहेत. यात त्यांची पत्नी वैशाली लोंढे यांचा देखील खारीचा वाटा आहे.
वल्लरीची आई वैशाली लोंढे यांच्यात आणखीन एक गुण आहे तो म्हणजे प्राणीप्रेम. “शाली बर्डस” नावाने प्राण्यांसाठी शहराच्या ठिकाणी त्या चक्क पाळणाघर चालवतात हे विशेष. कुत्रे, मांजरी यांसारखे पाळीव प्राण्यांसाठीच नाही तर गरुड, बगळे, सरडे यांसारखे दुखापत झालेले प्राणी, पक्षी त्यांच्याकडे आश्रयाला येतात. जखमी झालेले प्राणी, पक्षी त्या आपल्या पाळणाघरात आणतात. त्यांची व्यवस्थित काळजी घेऊन औषधोपचार करतात. जेव्हा हे पक्षी पुन्हा ठणठणीत बरे होतात तेव्हा खुल्या आकाशात त्यांना सोडून देण्यात येते. वल्लरीचे बालपण देखील याच प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या सहवासात गेले आणि आजही ते हे काम आवडीने करताना पाहायला मिळत आहेत.