वंदना गुप्ते यांनी कलर्स मराठीवरील “हे मन बावरे” ही मालिका साकारली होती. त्यांनी साकारलेली दुर्गा मॅडम ही विरोधी भूमिका तितकीच भाव खाऊन जाताना दिसली. बकेट लिस्ट, टाइम प्लिज, व्हाट्सअप लग्न, समांतर, लपंडाव, पछाडलेला या अशा अनेक चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. वंदना या पेशाने वकील असलेल्या शिरीष गुप्ते यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या त्यांना स्वप्ना आणि अभिजित ही दोन मुले. वंदना गुप्ते या दिग्गज गायिका “माणिक वर्मा” यांच्या कन्या. किराणा आणि आग्रा घराण्याच्या त्या शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या जातात. तर भारती आचरेकर, राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश या त्यांच्या सख्ख्या बहिणी.
भारती आचरेकर यांनी बॉलिवूड तसेच हिंदी टीव्ही मालिकेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. संजोग, अपने पराये, ईश्वर, बेटा, फिर भी दिल है हिंदुस्तानी या हिंदी चित्रपटासोबत त्यांनी वळू, अर्धांगिनी, सातच्या आत घरात सारख्या अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. दूरदर्शन वरील “वागळे की दुनिया” मधील त्यांनी साकारलेली मिसेस वागळे चांगलीच गाजली होती. सिया के राम, लापतागंज, चिडीया घर, कच्ची धूप या आणखी त्यांच्या गाजलेल्या हिंदी मालिका. मराठी पेक्षा हिंदी टीव्ही वाहिनीवर त्या चांगल्याच रुळलेल्या पाहायला मिळतात. बहुतांशी त्यांच्या वाट्याला विनोदी धाटणीच्याच भूमिका आलेल्या दिसतात.
तर त्यांची धाकटी बहीण राणी वर्मा या देखील आपल्या आईप्रमाणेच गायन क्षेत्रात नाव लौकिक करताना दिसतात. गा गीत तू सातारी ह्या गीतासोबत त्यांनी अडम तडम तडतड बाजा हा अल्बम आणि काही निवडक गीते गायली आहेत. अशोक पटेल यांच्यासोबत लग्न करून त्या काही काळ यूएसएला स्थायिक झाल्या परंतु २००५ साली त्यांनी दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.