कलाकारांचे आयुष्य हे सततच्या ट्रोलिंगने भरलेलं असतं. कारण ही मंडळी आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्यांना जे लिहावं वाटतं त्या गोष्टी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. पण यातून त्यांनी कुठले कपडे घालावेत, कशावर बोलू नये किंवा तू खूपच जाड झालीस बारीक हो असे अनेक सल्ले ट्रोलर्सकडून दिले जातात. काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमुळे मेघा धाडे हिलाही अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मेघा धाडे, सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत या तिघी बिग बॉस पासूनच्या मैत्रिणी. या तिघी आजही आपापल्या संसारात कामात व्यस्त असल्या तरी एकमेकींची कायम भेट घेत असतात. काही दिवसांपूर्वीच सई लोकूर हिला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. त्यानिमित्ताने या तिघींची पुन्हा रियुनियन पाहायला मिळाली. मेघा धाडे हिचं रत्नागिरी, पावस, गणेशगुळे येथे “मँगोज अँड सीशेल” या नावाचे फार्महाऊस आहे. या तिघीही मेघाच्या फार्महाऊसमध्ये मजामस्ती करायला आल्या होत्या.
त्याच फार्महाऊसमधील एका झुल्यावर या तिघी बसलेल्या होत्या. हा व्हिडीओ मेघाने सोशल मीडियावर शेअर केला. मात्र काही ट्रोलर्सने त्यांना झोका तुटेल, ३हत्ती, तुम्ही किती जाड झाल्या अशा कमेंट्स करून ट्रोल केले. त्यावर मेघाने ट्रोलर्सना संयमीत उत्तर दिलेले पाहायला मिळाले. मात्र काल जागतिक स्त्री दिनानिमित्त मेघाने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सच्या मानसिकतेवर खडेबोल सुनावले आहेत. ती म्हणते की, “मित्रांनो विमन्स डे आपण काय म्हणून साजरा करतो, की तो एक साजरा करायचा दिवस आहे म्हणून तो साजरा केला जातो का?. तिच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो. पण जर स्त्री बद्दल तुम्हाला खरंच आपुलकी असेल, तिला तुमच्या बरोबरीच मानत असाल, तुम्ही तिला एक माणूस म्हणून वागणुक दिली तरी खूप होणार आहे. एक दिवसासाठी नको पण रोजच्या जीवनात तुम्ही तिला थोडातरी मान देऊ शकणार नाही का? कारण मी अशा खूप कमेंट्स वाचलेल्या आहेत, मी जेव्हा बारीक होते तेव्हाही मला खूप बारीक आहेस आहि कमेंट मिळत होती आणि आता थोडी जाड झाले तरीही खूपच जाड झालीस अशी कमेंट मिळते.
फक्त माझ्याच बाबतीत नाही तर मी इतर मुलींच्या बाबतीतही तेच अनुभवते. तिच्या दिसण्यावरून, रंग रूपावरून तिला ट्रोल केलं जातं. एका स्त्रीचं आयुष्य हे अनेक टप्प्यातून जात असत. तुम्हाला जर हे अनुभवायचं असेल तर तुमची आई, बहीण याच टप्प्यातून जात असतात. लग्नानंतर पेग्नन्सीच शरीर, मूल झाल्यानंतरच शरीर, मोनोपॉज नंतरच शरीर या सारख्या अनेक बदलाला तिला सामोरे जावे लागत असते. पण तरीही ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. या गोष्टी कळायला तुमच्या घरात आयाबहिणी नाहीयेत. त्यामुळे प्लिज सोशल मीडियावर ट्रोलिंग करताना थोडातरी विचार करा. मला स्वतःला थायरॉईड आहे. यामुळे मला वाढलेलं वजन कमी करायला खूप प्रयत्न करावे लागतात. सिद्धार्थ जाधव सोबत शूटिंग करत असताना मी झाडावरून पडले तेव्हा मला स्पोडिलिसिसचा त्रास झाला. आता मला जड काहीही उचलायच असेल तर त्रास होतो. मित्रांनो सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करा. दुसऱ्यांना मागे खेचण्यासाठी ही टेक्नॉलॉजी नाहीये. आम्ही आमचे चित्रपट, प्रोजेक्ट, बिजनेस इथे प्रमोट करतो. पण तुम्ही डीमोटिव्हेट करता, दुसऱ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करता, अब्रूची लख्तरं बाहेर काढता. स्वतःचं काहीतरी चांगलं होईल यासाठी या टेक्नॉलॉजीचा तुम्ही उपयोग करून घ्या.”