रविंद्र महाजनी यांनी त्यांचा पहिला चित्रपट हा अभिनेत्री रंजना सोबत केला होता. त्याकाळी ही जोडी मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरलेली पाहायला मिळाली. झुंज या चित्रपटानंतर या दोघांनी एकत्रितपणे बरेचसे चित्रपट केले होते. देवघर या चित्रपटात अशोक सराफ रंजना आणि रवींद्र यांच्या जोडीने धमाल उडवली होती. त्याकाळात नायक नायिकेचे लग्न होणं ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना मुळीच आवडत नसायची . म्हणून अनेक कलाकारांनी त्यांचं खाजगी आयुष्य गुपित ठेवलेलं होतं. रविंद्र महाजनी यांचंही लग्न झालंय याबाबत कोणाला फारसं माहीत नव्हतं. खरं तर अनेक तरुणी, सहकलाकार या देखण्या नायकाच्या प्रेमात पडल्या होत्या पण रविंद्र महाजनी या सर्वांपासून चार हात लांबच राहायचे. स्वतः रंजनाला देखील रविंद्र महाजनी यांचं लग्न झालंय याची कल्पना नव्हती. पण कालांतराने एकत्रित काम करत असताना हळूहळू याबाबत त्यांना माहिती मिळत गेली.
माधवी आणि रंजना यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा मात्र ‘मधु तुझी बायको आहे?’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया तिने दिली होती. कारण रंजना आणि माधवी दोघीही एकाच कॉलेजमध्ये शिकायला होत्या. त्यामुळे रविंद्र महाजनी यांची बायको आपल्या कॉलेजचीच मुलगी आहे हे कळल्यावर रंजना शॉकच झाल्या होत्या. माधवी महाजनी या रुईया कॉलेजमध्ये असताना बॅडमिंटन चॅम्पियन होत्या. कॉलेजच्या स्पर्धेत त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावलेले होते. त्यामुळे त्यांची अख्ख्या कॉलेजमध्ये ओळख झाली होती. कॉलेजमध्ये त्यांचा एक मोठा ग्रुपही असायचा आणि हा ग्रुप खूप प्रसिद्ध झाला होता. त्याच कॉलेजमध्ये रंजनाही शिकायला होती. पण त्यावेळी ती विशेष काही करत नव्हती. पुढे रंजनालाही अभिनेत्री म्हणून झुंज चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. रविंद्र महाजनी यांनी आपल्या कॉलेजमधल्याच मुली सोबत लग्न केलंय हे रंजनाला मुळीच माहीत नव्हतं त्यामुळे मधूला समोर पाहताच तिला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता. त्यानंतर मात्र माधवी सोबत रंजनाचं छान बॉंडिंग जुळून आलं होतं.
रंजना आणि रविंद्र महाजनी यांना चित्रपटाच्या ऑफर मिळू लागल्या होत्या. ही जोडी लोकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. पण आपल्याला अजून काही चित्रपटाच्या ऑफर मिळायल्या हव्या यासाठी रंजनाने एक प्रस्ताव समोर ठेवला होता. माधविला विश्वासात घेऊन रविंद्र महाजनी आणि रंजना मध्ये अफेअर चालू आहे असं उठवूयात अशी रंजनाने एक युक्ती सुचवली होती. यातून रवीला प्रसिद्धी मिळतेय हे पाहूनच माधवी यांनी या प्रस्तावाला होकार दिला होता पण रविंद्र महाजनी यांना रंजनाचे म्हणणे मुळीच पटले नव्हते. मला जी काही प्रसिद्धी मिळवायची ती मी माझ्या हिमतीवर मिळवेल असे रविंद्र महाजनी यांचे स्पष्ट मत होते. कालांतराने रंजनाचा प्रवासादरम्यान एक मोठा अपघात झाला. या अपघातातून त्या वाचल्या पण त्यानंतर मात्र त्यांना कायमचे अपंगत्व आले. आणि त्यानंतर प्रेक्षकही या सुपरहिट जोडीला कायमचे मुकले.