मराठी प्रेक्षक जिला मारतात टोमणे तिचाच हिंदी मालिका सृष्टीत डंका… हिंदी मंचावर मातृभाषेत बोलून उपस्थितांची मनं जिंकली
आजवर अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदी मालिका सृष्टीत त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. प्रमुख, सहाय्यक, विरोधी ते अगदी चरित्र भूमिका या मराठी अभिनेत्रींनी साकारलेल्या पाहायला मिळतात. नुकत्याच पार पडलेल्या झी रिश्ते अवॉर्ड सोहळ्यात अशाच एका मराठी अभिनेत्रीची चर्चा पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री आहे हेमांगी कवी. हेमांगी कवी हिला ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या मालिकेतील भवानी चिटणीस या व्यक्तिरेखेसाठी ‘बेस्ट माँ’ चा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात याची हेमांगीला अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना ती भारावलेली पाहायला मिळाली. अशातच तिने सगळ्यांची नम्रपणे माफी मागून मातृभाषेतून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या मातृभाषेतून माझ्या भावना चांगल्या व्यक्त करू शकते असे म्हणत तिने उपस्थितांची मनं जिंकून घेतली.
यावेळी ती मराठीत बोलताना पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. अर्जुन बिजलानी आणि हर्ष लिंबाचिया यांनी हेमांगी मराठीतून बोलतेय पाहून तिच्याही मराठीतूनच संवाद साधला. तू छान बोलतेस अशी दाद त्यांच्याकडून मिळाल्यानंतर खालून ‘जय महाराष्ट्र’ ची घोषणा ऐकू आली. तेव्हा हा अद्भुत अनुभव पाहून हेमांगी कवी पुरती भारावून गेलेली पाहायला मिळाली. या अनुभवाबद्दल हेमांगी म्हणते की, काल मातृभाषदिन होता आणि कालच मला झी रिश्ते अवॅार्डस् २०२४ मध्ये माझ्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेतल्या ‘भवानी चिटणीस’ या व्यक्तीरेखेसाठी ‘Best Maa’ चा पुरस्कार मिळाला! माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच होता. रंगमंच्यावर गेल्यावर कळेना कुठल्या भाषेत माझ्या भावना व्यक्त कराव्या कारण समोर बसलेले बहुतांश लोक हिंदी भाषिक होते. मला हे माहीत असतानाही माझ्या तोंडून माझी मातृभाषा आली.
ऐकणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले आणि जेव्हा समोरून ‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं तेव्हा तर उर भरून आला, बळ मिळालं! त्यानंतर ज्या प्रकारे arjunbijlani आणि haarshlimbachiyaa30 ने मराठीत बोलल्यावर प्रोत्साहन दिलं तेव्हा तर आहाहा खूपच भारी वाटलं! रंगमंच्यावरून खाली आल्यानंतर बऱ्याच हिंदी भाषिक कलाकारांनी मी मराठीत व्यक्त झाल्याचं कौतुक केलं! आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर ही तितकंच प्रेम करतो! आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय! जय महाराष्ट्र!