अनुपमा फेम प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन…ऋतुराज यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हिंदी कलासृष्टीला हादरवणारी एक बातमी हाती आली आहे. अनुपमा मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता ऋतुराज सिंह यांचे आज मंगळवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. ऋतुराज सिंह हे ५९ वर्षांचे होते. ऋतुराज यांच्या अशा अचानक निधनाच्या बातमीने हिंदी मालिका सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऋतुराज हे १९९३ पासून मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकत होते. बनेगी अपनी बात , ज्योती , हिटलर दीदी , शपथ , वॉरियर हाई , आहट , अदालत , दिया और बाती हम यासारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत . कलर्स टीव्ही मालिका लाडो २ मध्ये त्याने बलवंत चौधरीची भूमिका चांगलीच गाजवली होती. वयाच्या १२ व्या वर्षापासून ऋतुराज नाटकातून काम करत असत.
ऋतुराज सिंह चंद्रवत सीसोदीया असे त्यांचे पूर्ण नाव आहे. ते मूळचे राजस्थान कोटा येथील राजपूत घराण्याचे आहेत. त्यांचे बालपण अमेरिकेत गेले होते त्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी ते भारतात परतले होते. वेबसिरीज ,मालिका, बॉलिवूड चित्रपट असा त्यांचा अभिनय क्षेत्रातला यशस्वी प्रवास सुरू होता. आशिकी, घर एक मंदिर, कुटुंब, कहाणी घर घर की, तहकिकात, कुलवधू, ये रिशता क्या केहलाता है, अनुपमा या मालिकेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या होत्या. अनुपमा मालिकेत त्यांनी यशपालचे पात्र साकारले होते.
ऋतुराज सिंह यांच्या निधनाच्या बातमीने अनुपमा मालिकेच्या कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. आई कुठे काय करते ही मराठी मालिका अनुपमा या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे अनुपमा मालिकेलाही मराठी प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमित बहल यांनी ऋतुराजच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर जाहीर करत शोक व्यक्त केला आहे. चारू सिंह यांच्यासोबत ऋतुराज विवाहबद्ध झाले होते. पत्नी, एक मुलगा अधिराज आणि एक मुलगी जहान असं त्यांचं कुटुंब आहे.