प्रार्थना बेहरेने मागितली जाहीर माफी … शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने अभिनेत्रीने मागितली माफी
अभिनेत्री प्रार्थना बेहरे आज लातूर मध्ये एका मॉलच्या उद्घाटनाला गेली होती. तिथे गेल्यानंतर प्रार्थनाने उपस्थितांना संबोधित करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे आढळले. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखवल्याने प्रार्थना बेहरेचे असणारे पोस्टर फाडण्यात आले आहे. प्रार्थना बेहरे ज्या मॉलच्या उद्घाटनाला आली होती ते बॅनर फाडत शिवप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलेला पाहायला मिळाला. लातूरच्या उदगीर परिसरात या नवीन किसान मॉलची स्थापना करण्यात आली होती. आज प्रार्थना बेहरे हिच्या हस्ते या मॉलचे उद्घाटन होणार होते त्यामुळे उदगीरकर सकाळपासूनच उत्साहित असलेले पाहायला मिळाले. उद्घाटनानंतर प्रार्थनाने उपस्थितांना संबोधित करताना आजच्या दिवसाचे महत्व सांगितले. “आज तुम्हा सर्वांना शिवाजी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा . यानिमित्ताने उदगीरचं दर्शन झालं ,आज शिवाजी जयंतीच्या दिवशी मी उदगीरमध्ये एन्ट्री केली तेव्हा खऱ्या अर्थाने शिवाजी जयंती तुम्ही कशी साजरी करतात हे कळले. सगळीकडे भगवा झेंडा फडकत होता तेव्हा इतकं बरं वाटलं हे सगळं बघून…” असे म्हणत प्रार्थनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आढळला.
हे पाहून तमाम शिवभक्तांनी प्रार्थना बेहरेवर नाराजी दर्शवत तिच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे. प्रार्थनाने जाहीर माफी मागावी अशीही मागणी केली जात आहे. दरम्यान या तीव्र पडसादानंतर प्रार्थनाने अजून तरी कुठली प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते, पण नुकतेच प्रार्थनाने या सर्वांच्या भावना दुखवल्याने जाहीर माफी मागितलेली पाहायला मिळत आहे.”आज मी उदगीर येथे किसान मॉल च्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर त्या बद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता.मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय”. असे प्रार्थनाने तिच्या या माफीनाम्यात म्हटले आहे. आज उदगीर शहरातील छत्रपती शाहू महाराज चौकातील किसान फॅशन मॉल उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल आज शिवसेना उदगीर च्या वतीने फॅशन मॉलच्या मॅनेजर व उदगीर शहरातील उद्योगपती सूर्यकांत जी मुक्कावार यांना जवाब विचारला गेला यावेळी त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांची जाहीर माफी मागितली आहे.