काल रविवारी ११ फेब्रुवारी रोजी झी मराठीवरील ‘जाऊ बाई गावात’ या रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. रमशा फारुकी हिने बावधनकारांची मनं जिंकत विजयाच्या ट्रॉफीवर शिक्कामोर्तब केला. जाऊ बाई गावात या शोच्या पहिल्या पर्वाची विजेती होण्याचा मान रमशाला मिळाल्याने तिच्यावर प्रेक्षकांनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. रमशा वेजेतेपदाची खरी दावेदार होती आणि तिने सगळ्या मोहिमा यशस्वीपणे पार केल्या होत्या. रमशाची हेअर स्टाईल गावातल्या मुलींनी कॉपी केली होती. त्यामुळे विजेरेपदासाठी बावधनच्या गावकऱ्यांना रमशा योग्य वाटली. ४ डिसेंबर २०२३ रोजी बावधन गावात सुरू झालेल्या या रिऍलिटी शोची काल ११ फेब्रुवारीला सांगता झाली. यावेळी आदेश बांदेकर, महेश मांजरेकर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी हजेरी लावली होती. बिग बॉसच्या वादग्रस्त शोला फाटा देत जाऊ बाई गावात या शोनेही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
त्यामुळे आता दुसऱ्या प्रवालाही प्रेक्षक असाच चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास आता झी मराठी आणि शोच्या आयोजकांना वाटू लागला आहे. पण महत्वाचं म्हणजे जाऊ बाई गावात या शोच्या विजेतीला बक्षीसातील रक्कम कमी करून देण्यात आल्याने प्रेक्षकांनी थोडीशी नाराजी दर्शवलेली पाहायला मिळत आहे. रमशा फारुकी हिला विजयाच्या ट्रॉफीसह २० लाखांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. पण खरं तर विजेत्याला २५ लाख रुपये देणार असे सांगण्यात आले होते. खरंतर काही भागांपुर्वीच सूत्रसंचालक हार्दिक जोशीने या रकमेबाबत एक विधान केले होते की, काही कारणास्तव बक्षिसाची रक्कम कमी करण्यात आली आहे. त्यामुळे रमशाला २५ लाखां ऐवजी २० लाख रुपये देण्याचे ठरवले. विजेत्याच्या बक्षिसातून ५ लाख रुपये कमी करण्यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न जाणकार प्रेक्षक विचारू लागले आहेत.
जर विजेत्याला २५ लाख रुपये देण्याचे ठरले होते तर तिला तेवढे बक्षीस देणे अपेक्षित होते. यामुळे विजेत्याचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. झी मराठी वाहिनी आणि आयोजकांनी त्यांचा शब्द पाळायला हवा होता अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. विजेत्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वाहिनीने आणि उपाययोजकांनी काहीतरी उपाययोजना करायला हवी असेच मत आता व्यक्त करण्यात येत आहे. पण पैशांचा प्रश्न वगळता जाऊ बाई गावात ह्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. रटाळवाण्या मालिका पाहण्यापेक्षा काहीतरी चांगलं पाहायला मिळालं आणि असे कार्यक्रम पुढेही झी मराठीने करायला हवेत अशी अपेक्षा देखील चाहते करताना पाहायला मिळत आहेत.