पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे जात असताना यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध …अभिनेत्रीची खरमरीत प्रतिक्रिया
निर्भय बनो या कार्यक्रमासाठी पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे जात असताना पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी पत्रकार निखील वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक ट्विट केले होते. या ट्विट नंतर निखिल वागळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे शहर भाजपने निर्भय बनो या कार्यक्रमास विरोध केल्यास आपण सुरक्षा पुरवू अशी भूमिका काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती त्यासाठी ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, संजय मोरे या नेत्यांचा समावेश होता. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी निखिल वागळे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. त्यांच्यासोबत वकील असीम सरोदे हेही कार्यक्रमात उपस्थित राहणार होते. मात्र हे संरक्षण देऊनही भाजपच्या कार्यकर्त्यांनी चार वेळा निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला चढवला . एवढेच नाही तर निखिल वागळे यांच्या पुढे अंडी आणि शाईफेक सुद्धा करण्यात आली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलेले पाहायला मिळाले. निखिल वागळे, असीम सरोदे यांच्यावरील हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात आला. अभिनेत्री वीणा जामकर हिनेही निषेध नोंदवताना एक खरमरीत प्रतिक्रिया दिली.
“सन्माननीय निखिल वागळे, चौधरी सर आणि असीम सरोदे ह्यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!!!” म्हणून विणा जामकरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान पत्रकरांवर असे भ्याड हल्ले करणे चुकीचे आहे. पंतप्रधानांवरील एका ट्विटनंतर निखिल वागळे यांना भाजपा कार्यकर्त्यांनी धारेवर धरले होते. त्याचाच परिणाम म्हणून हा हल्ला करण्यात आला होता. तेजस्विनी पंडित नंतर आता वीणा जामकर हिनेही भाजपाच्या या भूमिकेवर विरोध दर्शवला आहे. कलाकार देखील आता राजकीय घडामोडींवर व्यक्त होऊ लागले आहेत.