माधवी महाजनी यांनी चौथा अंक या त्यांच्या पुस्तकात रविंद्र महाजनी यांच्या सोबतच्या अनेक गोड आठवणी शेअर केल्या आहेत. शाळेत असतानाच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. पण रविंद्र महाजनी यांना लग्नागोदरच जुगार खेळण्याचा, व्यसनाचा नाद लागला होता. त्याचे कारणही तेवढेच मोठे होते. कारण माधवी महाजनी यांच्या प्रेमात पडण्यागोदर ते एका मुलीच्या प्रेमात होते. रविंद्र महाजनी यांच्या आई सुशीलाबाई आणि वडील ह रा महाजनी हे दोघेही स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. वेळप्रसंगी या दोघांनीही काही काळ तुरुंगवास भोगला होता. त्या दोघांचाही प्रेम विवाह होता. यशवंतराव चव्हाण, आचार्य भागवत, एस एम जोशी या व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला. आईवडिल कर्तृत्ववान त्यांचा प्रभाव रविंद्र महाजनी यांच्यावर पडलेला होता.
त्यामुळे आपण शिकून डॉक्टर व्हायचं असा त्यांचा निश्चय होता. अभ्यासातही ते खूप हुशार होते. पण प्रेमभंग झाला आणि रविंद्र महाजनी यांचे नशीबच पालटून गेले. रविंद्र महाजनी काहीच काम करत नसल्याने त्या मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले होते. त्यामुळे रविंद्र महाजनी निराशेत वावरत होते. अशातच गालगुंड झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बरेच दिवस उपचार चालू असल्याने मेडिकलला जायचे स्वप्न अर्धवट राहिले. अशातच अभ्यासातही त्यांचे मन रमेनासे झाले. डिप्रेशनमध्ये गेलेला माणूस लवकरच वाईट मार्गाला स्वीकारतो अशीच अवस्था रविंद्र महाजनी यांची झालेली होती. कुठल्याच गोष्टीवर लक्ष लागेना त्यामुळे ते लवकरच व्यसनाधीन झाले. पण हे व्यसन करायचं म्हटलं तर पैसे लागतात. म्हणून मग ते जुगाराकडे वळले. जुगारात ते कायम हरतच असत. त्यामुळे ते आणखीनच खचून जात असत.
याच परिस्थितीत असताना माधवी सोबत त्यांची ओळख झाली होती. मी दारु पितो व्यसन, जुगार खेळतो असं अगोदरच रविंद्र महाजनी यांनी मधवीला सांगून टाकले होते. पण या कशाचाच माधवी यांच्यावर परिणाम झाला नाही उलट रविंद्र महाजनी यांच्यावर त्या अधिकच प्रेम करू लागल्या होत्या. फक्त परिस्थिती सुधारेल या आशेवर त्या शेवटपर्यंत राहिल्या. रविंद्र महाजनी काहीच काम करत नाही. जुगार आणि व्यसन करतो या गोष्टींमुळे त्यांच्या लग्नाला माधवीच्या घरातून विरोध होता. तर सासूबाईंनी सुद्धा माधवीची भेट घेऊन त्यांना लग्न करू नका असा सल्ला दिला होता. एका चांगल्या मुलासोबत तुझे लग्न लावून देतो पण व्यसनाच्या आहारी गेलेल्या रविंद्र सोबत तू लग्न करू नको असे त्यांनी समजावून सांगितले होते. माधवीच्या मैत्रिणींनी देखील या लग्नाला विरोध केला होता. पण या सगळ्याला न जुमानता माधवी यांनी दसऱ्याच्या दिवशी १० ऑक्टोबर १९७० रोजी रविंद्र महाजनी यांच्यासोबत प्रेमविवाह केला.