सासूबाई आणि माझ्यात पहिल्यांदा खूप वाद झाला…असं होतं रवींद्र महाजनींच्या पत्नी माधवी यांचं सासूबाईसोबतचं नातं
दिवंगत अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचे ‘चौथा अंक’ हे आत्मचरित्र पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केले आहे. २९ जानेवारी रोजी पुण्यात या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा पार पडला होता. त्यावेळी गश्मीर महाजनी याने या पुस्तकाची प्रस्तावना वाचून दाखवली होती. माधवी महाजनी यांनी हे पुस्तक रविंद्र महाजनी यांच्या निधनाअगोदरच लिहून पूर्ण केले होते मात्र असे काही घडेल याची त्यांना अजिबातच कल्पना नव्हती. रविंद्र महाजनी यांच्या जाण्याने माधवी महाजनी यांची अवस्था काय होती हेही त्यांनी पुस्तकात बदल करून नमूद केलेले आहे. कुणालाही नायक किंवा व्हिलन बनवण्याच्या हेतूने हे पुस्तक लिहिले नसून मी माझ्या आयुष्यात जे काही अनुभवलंय ते सगळं मी त्यात लिहिलंय असे त्या प्रांजळपणे सांगतात. रविंद्र महाजनी आणि माधवी महाजनी यांचा प्रेमविवाह होता.
१० वी इयत्तेत असल्यापासूनच त्या दोघांची ओळख होती. रविंद्र महाजनी माधवी यांना प्रेमाने मधु अशी हाक मारायचे. त्यांच्यासोबत असलेल्या अनेक चांगल्या, कटू आठवणी माधवी यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. या पुस्तक प्रकाशनवेळी माधवी महाजनी यांनी त्यांच्या सासूसोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ” माझे लग्न झाले तेव्हा मी २० वर्षांची होते. माझ्या सासूबाई आणि माझ्या वयात खूप अंतर होते. म्हणजे त्या जवळपास ४० वर्षांनी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. मी लाडात वाढलेली मुलगी त्यामुळे मला सांगायला लाज वाटते की मला स्वयंपाक अजिबातच येत नव्हता. साधा चहा सुद्धा मला बनवता येत नव्हता. त्यामुळे मी बाकीची कामं करत बसायचे आणि माझ्या सासूबाई स्वयंपाकाचे काम बघायच्या. एक दिवस त्या मला ओरडल्या. काहीतरी इकडं तिकडं करण्यापेक्षा स्वयंपाक कर असे त्या म्हणाल्या तेव्हा मला त्यांच्या बोलण्याचा राग आला.
मग मीही त्यांना असंच काहीतरी बोलून गेले. तेव्हा त्यांनी माझ्या आईला फोन करून बोलावून घेतले. माझी आई लगेचच माझ्या घरी आली आणि ‘आता हेच तुझं घर आहे आणि ह्याच तुझी आई आहेत’ असे म्हणत माझे कान पिळले. त्यानंतर काय झालं माहीत नाही पण माझ्या सासूबाई आणि माझ्यात मैत्रीचं नातं तयार झालं. इतकं की त्या माझ्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारायला, फिरायला, सिनेमाला येऊ लागल्या. माझ्या धाकट्या बहिणीच्या मैत्रिणींसोबतही त्यांची छान गट्टी जमली होती. सगळ्यांमध्ये त्या छान रुळल्या होत्या. त्यावेळी माझ्या आईने माझे कान पिळले म्हणूनच हे सर्व शक्य झालं”. आपलं चुकलं सासूबाईंशी आपण चुकीचं वागलो अशी प्रामाणिक कबुली माधवी महाजनी यावेळी देतात. हे सर्व प्रसंग माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात नमूद केल्या आहेत.