हा आहे जगातील सर्वात बुद्धिवान मुलगा… अनेक पुस्तकांचा लेखक तसेच मुंबई विद्यापीठाच्या रुईया कॉलेजमध्ये गेस्ट प्राध्यापक
काही मुलं ही मुळातच खूप बुद्धिमान असतात. ही एक दैवी शक्ती घेऊनच ते जन्माला येतात. भारतीय वंशाचा पण जन्माने अमेरिकेन असलेला अवघ्या ११ वर्षांचा हा चिमुरडा प्राध्यापक म्हणून स्वतःची ओळख मिरवत आहे. प्राध्यापक सोबोर्नो बारी असे या चिमुरड्याचे नाव आहे. ९ एप्रिल २०१२ रोजी न्यूयॉर्क प्रेस्बिटेरियन क्वीन्स हॉस्पिटलमध्ये त्याचा जन्म झाला. ‘ द लव्ह’ पुस्तकाचा लेखक आणि जगातील सर्वात तरुण प्राध्यापक अशी त्याने ओळख बनवली आहे. मुंबई विद्यापीठाच्या रुईया कॉलेजमध्ये तो गेस्ट प्राध्यापक म्हणून रुजू झाला तेव्हा तो अवघ्या सात वर्षांचा होता. सोबोर्नोचे वडील रशिदुल आणि आई शाहेदा हे बांगलादेशातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. सोबोर्नोला रेफथ नावाचा भाऊही आहे.
सोबोर्नो सहा महिन्यांचा असतानाच बोलायला लागला होता. दोन वर्षांचा असताना तो गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे प्रश्न सोडवू लागला. त्याच्या पालकांच्या हे लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. तेव्हा त्याने स्थानिक टीव्ही माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. ३ नोव्हेंबर २०१४ रोजी, जेव्हा सोबोर्नो फक्त दोन वर्षांचा होता, तेव्हा मेडगर एव्हर्स कॉलेजचे उपाध्यक्ष जेराल्ड पॉसमन यांनी त्याची मुलाखत घेतली. कठिणातले कठीण प्रश्न सोडवून त्याने व्हॉइस ऑफ अमेरिका (VOA) चे लक्ष वेधून घेतले. १३ फेब्रुवारी २०१५ मध्ये VOA ने दोन वर्षांच्या सोबोर्नोला मुलाखतीसाठी आमंत्रित केले. VOA ने ही मुलाखत त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केली. १९४२ मध्ये VOA च्या स्थापनेपासून सोबोर्नो हा सर्वात कमी वयाचा मुलाखत देणारा मुलगा ठरला होता. एप्रिल २०१६ मध्ये न्यूयॉर्कमधील सिटी कॉलेजच्या अध्यक्षा डॉ. लिसा कोइको यांनी सोबोर्नोची गणित आणि विज्ञानाबद्दलची अचाट बुद्धिमत्ता पाहून “आमच्या काळातला आइंस्टाईन” हे नाव दिले. २०१६ मध्ये, वयाच्या चौथ्या वर्षी सोबोर्नोला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून त्याच्या गणित आणि विज्ञानातील कामगिरीबद्दल मान्यता देण्यात आली.
न्यूयॉर्क शहरातील प्रतिभावान व्यक्ती म्हणून त्याला विविध कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले. सोबोर्नो सध्या डेव्हिसन अव्हेन्यू इंटरमीडिएट स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत आहे तर हॉवर्ड टी. हर्बर मिडल स्कूलमध्ये नवव्या इयत्तेत शिकत आहे. २०१९ मध्ये सोबोर्नोला नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर आणि रुईया ऑटोनॉमस कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अनुश्री लोकूर यांच्याकडून भारताला भेट देण्याचे आमंत्रण मिळाले. ३ जानेवारी २०२० रोजी सोबोर्नो यांना नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्याकडून ‘ग्लोबल चाइल्ड प्रॉडिजी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेक्रेड हार्ट कॉलेज आणि गीता जेव्हॉन कॉलेजसह अनेक भारतीय विद्यापीठांमध्ये त्याला नियमितपणे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात येते.सोबोर्नो त्याच्या युट्युबवरील चॅनेलद्वारे लाखो विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाचे धडे देत आहे. लाखो विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयाच्या प्रेमात पडण्याची त्याने प्रेरणा दिली आहे. २०२१ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेच्या द विंची या संस्थेकडून द विंची पुरस्कार जिंकला होता.