सध्या मालिका सृष्टीत लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलांनी, तसेच झी मराठीच्या सारं काही तिच्यासाठी या मालिकेत लग्नाचे सोहळे रंगलेले पाहायला मिळत आहेत. पण इथे खऱ्या आयुष्यातही झी मराठी वाहिनीच्या मालिकेतील एका अभिनेत्रीची लगीनघाई सुरू झालेली आहे. झी मराठीची सध्याची आघाडीची मालिका म्हणजेच तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अभिनेत्री ऋता काळे हिच्या मेंदीचा सोहळा सुरू झाला आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत ऋताने नायिकेच्या बहिणीची म्हणजेच इराची भूमिका साकारली आहे. सध्या ऋताने मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नायक, नायिका आणि खलनायिका यांच्या सिनवर भर देण्यात येत आहे.
नोव्हेंबर महिन्यात ऋताला तिच्या बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. त्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या शेवट त्यांच्या लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री ऋता काळे हा मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिषेक लोकनर सोबत लग्न करत आहे. अभिषेकने त्याच्या हातावर ऋताच्या नावाची मेंदी सजवली आहे. अभिषेकच्या मित्रांनी त्यांच्या संगीत सोहळ्यात कुठल्या गाण्यावर डान्स करायचा याची तयारी देखील केलेली आहे. त्यामुळे या लग्नाची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमुळे ऋता काळे प्रकाशझोतात आली. रंगभूमीवरून तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पंधरवडा, अनवट या चित्रपटात तिने काम केले होते. याच चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक लोकनर सोबत तिचे प्रेमाचे सूर जुळून आले..
या चित्रपटात काम केल्यानंतर दोघांची ओळख वाढली आता हे दोघेही नात्याच्या बंधनात अडकताना दिसणार आहेत. गोठ या लोकप्रिय मालिकेत तिने बकुळाची भूमिका साकारली होती. छोट्या छोट्या भूमिकेतून पुढे आल्यानंतर तिला अनवट सारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. आता मालिकेतून ब्रेक घेऊन ती खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकताना दिसणार आहे. ऋता आणि अभिषेकच्या लग्नाला कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.