नाट्य चळवळीचे कार्यकर्ते आणि समाजसेवक रामकृष्ण केशव नाईक यांचे काल रविवारी २८ जानेवारी २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. रामकृष्ण नाईक हे ९६ वर्षांचे होते. काल संध्याकाळी ५ वाजता मडगाव येथिल मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामकृष्ण नाईक हे अविवाहित होते त्यामुळे आयुष्यभर ते ज्या संस्थेशी जोडले गेले तिथल्या लोकांना त्यांनी जवळचे केले होते. कोंबा, मडगाव येथील रहिवासी असलेल्या नाईक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्नेह मंदिर या वृद्धाश्रमाला आपले घर बनवले होते. ही संस्था त्यांनी स्थापनेपासून मनापासून जोपासली होती. रामकृष्ण नाईक यांचा ३ नोव्हेंबर १९२८ रोजी जन्म झाला. १९५० च्या सुमारास त्यांनी मुंबईत चार्टर्ड अकाउंट म्हणून कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर गोवा हिंदू असोसिएशनकडे ते आकर्षित झाले, ही सर्वात जुनी सांस्कृतिक आणि सामाजिक कल्याणकारी संस्था आहे जी १९१९ मध्ये हिंदू गोवावासियांच्या एका गटाने स्थापन केली होती.
१९५६ मध्ये, जेव्हा गोवा हिंदू असोसिएशनने कला विभाग स्थापन केला तेव्हा त्याची जबाबदारी नाईक यांनी सांभाळली होती. नाईक यांनीच पं जितेंद्र अभिषेकी यांना नाट्यकलेकडे ओढले असे म्हटले जाते. दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनाही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत गेले. त्यांच्या आठवणीत वीरेंद्र प्रधान यांनी एक भावुक पोस्ट लिहिली आहे त्यात ते म्हणतात की, “रामकृष्ण काका नाईक . नाईक काका . आमचे लाडके नाईक काका . मी पहिल्यांदा काकांना भेटलो विजय केंकरेच्या घरी . भालचंद्र पेंढारकर म्हणजे अण्णा पेंढारकर यांच्या घरी मी रहात असे . तिकडे एकदा विजय केंकरे चा फोन आला , वीरू .. गोवा हिंदू असोसिएशन च नवीन नाटक येतंय . बालकवी यांच्या आयुष्यावर आधारीत . बालकवींची भूमिका तू करणार का ? ये घरी . मी विजय च्या घरी पोहोचलो . दामू काका ( दामू केंकरे काका ) , कानेटकर काका ( वसंत कानेटकर ) , अभिषेकी बुआ ( जितेंद्र अभिषेकी ) , पत्की काका ( अशोक पत्की ) , शौनक अभिषेकी , विजय आणि नाईक काका सगळे मैफिल जमावी तसे बसले होते . मला समोर बसायला सांगितल . बुआ म्हणाले , अण्णा पेंढारकरांचा भाचा तू , गातोस का ? मी खरतर या सगळ्याना एकत्र बघून बर्फ झालो होतो . नाईक काका जवळ आले . माझ्या पाठीवरुन हात फिरवला ….. खरं सांगतो , ते मायेचे आणि विश्वासाचे हात अजून माझ्या पाठीवर आहेत . तुम्हाला हा नाईक काकांचा चेहेरा बघून जाणवेल मी काय म्हणतोय .
नाईक काका म्हणाले – विरेंद्र गा . मी गायलो . बुआ समोर , पत्की काका समोर , कानेटकर काका , दामू काका , शौनक , आणि विजय . माझं गाण झालं आणि दामू काका आणि नाईक काका म्हणाले – विरेंद्र , तू काम करतो आहेस . नाटक होतं तू तर चाफेकळी. ३ महीने तालमी झाल्या आणि पुढे २५ एक प्रयोग . भीती खुप वाटली हे नाटक करताना . बालकवींची भुमिका करताना . शिव धनुष्य होतं . पण प्रयोग छान झाले . श्रेय कोणाचं माहितीये ? सांगताना ही डोळ्यांत पाणी उभं राहिलंय . श्रेय , या हसऱ्या चेहऱ्या मागच्या सच्च्या माणसाचं . ही सगळी सच्ची माणसं. देवाची माणसं. दामू काका स्ट्रिक्ट होते . मी घाबरायचो. तेव्हा त्यांच्याशी प्रेमाने वाद घालणारे नाईक काका , कानेटकर काका अजून आठवतात . देवाच्या कृपेने सांस्कृतिक श्रीमंती मुबलक मिळाली . अण्णा पेंढारकर , गोखले अण्णा ( विद्याधर गोखले ) , बाळ कोल्हटकर , सखाराम भावे , मालती पेंढारकर , दामू केंकरे , वसंत कानेटकर , वपू काळे , अभिषेकी बूआ, मोहन वाघ काका , मच्छिंद्र कांबळी काका , भक्ती बर्वे , दिलीप कुलकर्णी , विनय आपटे , विक्रम गोखले … नाईक काका .. किती नावं घेऊ ? खुप होती ही देव माणसे . एक एक करुन गेली . जातायत . देवाकडे मैफील जमवली असेल . आणि नाईक काकांनी जसा माझ्या पाठीवरुन हात फिरवला , जशी खारीच्या पाठीवर प्रभू रामचंद्रांची बोटं उमटली , तसाच हात ते त्याच प्रेमाने आणि हक्काने देवाच्या पाठीवरुन फिरवत म्हणत असतील – राहू दे रे . नको एवढा स्ट्रिक्ट वागूस . आपलीच आहेत सगळी . तुझीच मुलं. बेसूर असतील तर सुरात येतील . सुरात असतील तर लोकां ना आनंद देतील . तू ही हस , माझ्या सारखा . जगात हे निरागस निखळ हसू ठेव . तेच जिवंत ठेवेल जगाला … नाईक काका miss you”