मराठा आरक्षण मिळताच या कलाकारांनी दिल्या वेगळ्याच प्रतिक्रिया… कोणी सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर भडकलं तर कोणी
काल शनिवारी मनोज जरांगे यांच्या अथक प्रयत्नानंतर मराठा आरक्षणाला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केलेला पाहायला मिळाला. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई तूर्तास तरी थांबलेली पाहायला मिळत आहे. मराठा समाज आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्यांच्या मुलांना कमी खर्चात शिक्षण उपलब्ध व्हावे अशी एकंदरीत या आरक्षणात मागणी करण्यात आली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक नेतेमंडळींनी विरोध दर्शवला होता. पण आता आरक्षण मिळाल्यानंतर मराठी सृष्टीतील काही कलाकारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रभर सर्वेक्षण करण्यात येत होते. यासाठी कर्मचारी घरोघरी जाऊन मराठा समाजाच्या नोंदणी करून घेत होते.
सरकारने दिलेल्या आदेशानुसारच हे काम सुरू होते. पण अभिनेत्री केतकी चितळे हिने या सर्वेक्षणाला विरोध दर्शवलेला पाहायला मिळाला. केतकी चितळेने तिच्या घराजवळ आलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला हटकले आणि तुम्ही सगळ्यांना जात का विचारता ? असा प्रश्न केला. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी तुम्हाला तुमची जात विचारण्यात येते हे पाहून केतकी संतापलेली पाहायला मिळाली होती. सर्वांना समान नागरी कायदा का नाही लागू होत? तुम्हाला तुमची जात पाहून कायदे, नियम घालून दिले जातात या मुद्द्यावर केतकीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात तिच्या म्हणण्यानुसार कुणालाही आरक्षण न देता सरसकट सर्वांना समान वागणूक द्यावी एवढेच तिचे यातून म्हणणे होते. केतकी पाठोपाठ अभिनेता पुष्कर जोग यानेही याच मुद्द्यावरून आपला संताप व्यक्त केला. ‘काल बीएमसीचे कर्मचारी माझ्या घरी आले आणि त्यांनी मला जात विचारली. त्या जर महिला कर्मचारी नसत्या तर त्यांना दोन लाथा घातल्या असत्या’ असा पुष्करने संताप व्यक्त केला होता. केतकी आणि पुष्कर दोघांनीही जात विचारू नये आणि सगळ्यांना समान वागणूक द्यावी हे त्यांच्या कृतीतून अधोरेखित करून दिले.
पण अभिनेता शशांक केतकरने मराठा आरक्षण जाहीर करताच एका वेगळ्या आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. “चला आता खूप अभ्यास करुन चांगले टक्के मिळवा, मेहनत करा आणि भरपूर प्रगती करा. देशाचं कल्याण करा.” असे म्हणत शशांकने आता आपल्या मुलांना अभ्यास करून उत्तम गुण मिळवण्याशिवाय कुठला पर्याय राहिलेला नाही असे अधोरेखित केलेले पाहायला मिळाले. अर्थात यामुळे शशांकने भविष्याबद्दल एक काळजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. पण इथेही अरक्षणा ऐवजी समान नागरी कायदा लागू करण्यात यावा असेच या तिघांनी सुचवलेले पाहायला मिळाले.