व्हायरल होत असलेल्या गाण्यातील कलाकार आहेत प्रसिद्ध कलाकारांची मुलं… आजोबाही होते प्रसिद्ध गायक
सोशल मीडियावर या दोन कलाकारांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याअगोदर देखील या गायकांनी वेगवेगळ्या गाण्यांवर रिमिक्स बनवून प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यांनी रिमिक्स केलेल्या ‘हिल हिल पोरी हिला…’ या गाण्याला एका दिवसातच ३ लाख ३८ हजाराहून अधिक व्ह्यूव्ह्ज मिळालेले आहेत. ही टॅलेंटेड मुलं मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची मुलं आहेत हे जाणून तुम्हाला नक्कीच त्यांचं कौतुक करावंसं वाटेल. निहार शेंबेकर आणि सई गोडबोले हे दोघेही प्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांची नातवंड आहेत. जयवंत कुलकर्णी यांनी हिल हिल पोरी हिला, मनाच्या धुंदीत लहरित, बिलनशी नागीण निघाली, विठूमाऊली तू, वासुदेव आला हो अशी अनेक चित्रपट गीतं, भक्ती गीतं, भावगीतं त्यांनी आपल्या गायकीने अजरामर केली आहेत.
त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत संगीता शेंबेकर या त्यांच्या मुलीने गायनाची वाट धरली. तर त्यांची धाकटी मुलगी किशोरी गोडबोले यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. निहार हा संगीता शेंबेकर यांचा मुलगा. चिमणी पाखरं या चित्रपटात निहारने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर निहारने अभिनय क्षेत्राकडे न जाता आई, वडील आणि आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत संगीत क्षेत्राची वाट धरली. तर किशोरी गोडबोले यांची लेक सई ही मल्टीटॅलेंटेड गर्ल म्हणून ओळख बनवत आहे. सईला परदेशी भाषा अवगत आहेत. गायन, अभिनय अशा कलेचीही तिला आवड आहे.
आजोबा आणि आई दोघांचेही तिने गुण हेरलेले आहेत. कंटेंट क्रिएटर अशी ती सोशल मीडियावर ओळख बनवत आहे. निहार आणि सई हे दोघेही भावंडं त्यांचं हे टॅलेंट सोशल मीडियावर शेअर करत आहे. दोघांनी रिमिक्स केलेल्या या गाण्यांना चांगली लोकप्रियता देखील मिळत आहे. याअगोदर दोघांनी काय गं सखू, गोविंदा आला रे, देह देवाचे मंदिर अशी गाणी रिमिक्स बनवली होती. त्याला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर हिल हिल पोरी हिला या गण्यालाही चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे.