२ एकर शेतीला ट्रॅक्टर कशाला हवा १ लाखाची सबसिडी मिळवण्यासाठी तुम्ही ५ लाखाचं लोन …. मकरंद अनासपुरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
येत्या शुक्रवारी म्हणजेच २६ जानेवारी रोजी “नवरदेव बीएसस्सी ऍग्री” हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राम खाटमोडे यांनी केलेलं आहे. क्षितिश दाते आणि प्रियदर्शनी इंदलकर हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. गार्गी फुले, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, हार्दिक जोशी, तानाजी गलगुंडे हे कलाकार त्यांना साथ देणार आहेत. शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही असे विदारक चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. याच मुद्द्याला हात घालून दिग्दर्शकाने नवरदेव बीएस्सी ऍग्री हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आणला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मकरंद अनासपुरे यांनी सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टला मुलाखत दिली आहे.
यावेळी मकरंद अनासपुरे यांनी छोट्या भूधारक शेतकऱ्यांसाठी एक मोलाचा सल्ला देऊ केला आहे. त्यांचा हा सल्ला खरोखरच विचार करण्यासारखा आहे. कारण यामुळे छोट्या शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल असे मत आता व्यक्त केले जात आहे. मकरंद अनासपुरे याबाबत नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात. “माझं असं वैयक्तिक मत आहे ज्याची २ एकर शेती आहे त्याला वैयक्तीक ट्रॅक्टर कशाला पाहिजे?. ट्रॅक्टरची जाहिरात करताना ती आयडियलीच केली जाते. की ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला एक लाखाची सबसिडी दिली जाते. पण ते एक लाख मिळवण्यासाठी तुम्ही ५ लाखांचं लोन घेणार. पण मग तुम्हाला २ एकरासाठी ट्रॅक्टर कशाला पाहिजे. यावर उपाय म्हणजे तुम्ही ५ शेतकरी एकत्र या म्हणजे तुमची १० एकर शेती होईल. एवढंच नाही तर त्या ५ लाखांचं लोन देखील ५ जणांमध्ये विभागून घेता येईल.
हेच जर तुम्ही २० जणांना एकत्र येऊन केलं तर तुमच्या लोनची अमाउंट आणखी कमी होईल. ट्रॅक्टर तुम्हाला तुमच्या तेवढ्याच कामापूरता लागणार आहे. यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शेतात कामं करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. पण हेच जर तुम्ही २० जणं एकत्र मिळून काम करणार असाल तर ४० एकर साठी घरातील आणखी काही व्यक्ती त्या कामात सहभागी होतील आणि त्यातून तुम्ही एकमेकांची नक्कीच मदत करू शकता. लहानपणी आपण सगळ्यांनीच एक गोष्ट ऐकली आहे एक लाकूड तुटतं पण त्याची मोळी बांधली तर ती एकट्याला तोडायला शक्य नसतं”.