मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहिलेल्या कलाकारांना म्हाडाच्या घराचा आधार असतो. मुंबई सारख्या महागड्या ठिकाणी तुमचं स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न म्हाडाच्या स्कीममधून पूर्ण होत असते. कलाकारांसाठी त्यातील १० टक्के कोटा राखीव ठेवण्यात येत असतो. याचा फायदा आजवर अनेक कलाकारांनी करून घेतलेला आहे. गेल्या वर्षात पृथ्वीक प्रताप, अक्षय केळकर, अश्विनी कासार यांना म्हाडाची घरं मिळाली आहेत. तर आता नुकतेच आई कुठे काय करते मालिका फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिलाही म्हाडाची लॉटरी लागली आहे. साताऱ्यातील वाई शहराजवळील पसरणी हे अश्विनी महांगडे हिचं गाव. अश्विनीच्या वडीलांना अभिनयाची आवड असल्याने तिलाही या क्षेत्राची ओढ लागली होती.
वेळप्रसंगी तिने आपले गाव सोडून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. इथे आल्यानंतर तिलाही काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागला. अस्मिता या मालिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून तिने राणूअक्काची भूमिका गाजवली. सध्या ती वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच आता आपणही मुंबईकर व्हावं असं तिचं स्वप्न होतं. तिचं हे स्वप्न आता सत्यात उतरलेलं पाहायला मिळत आहे. “प्रचंड स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. मग काय, स्वप्नं पूर्ण होतातच. आज एक स्वप्न पूर्ण झालं.” असं म्हणत अश्विनीने तिच्या म्हाडाच्या घराचा ताबा मिळवला आहे. अश्विनीने घराची चावी दाखवत नवीन घर खरेदी केल्याचं चाहत्यांना कळवलं आहे.
तिने पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना एका खास व्यक्तीचा तिला पाठिंबा मिळाला तो म्हणजे निलेश जगदाळे याचा. निलेश जगदाळे आणि अश्विनी महांगडे हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी निलेशची मोठी साथ मिळाली असे अश्विनी कायम म्हणत असते. साताऱ्याच्या लेकीने आज मुंबईत आपलं हक्काचं घर खरेदी केलं यासाठी तिच्या चाहत्यांकडून मोठे कौतुक होत आहे. त्याच बाजूला साताऱ्याच्या आणखी एका ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेला रोहित माने यानेही कालच हक्काचं घर खरेदी केल्याचे कळवले होते.