सोशल मिडियावरील चुकीच्या बातमीमुळे काय घडते याचा अनुभव स्वतः दिग्दर्शक साजिद खानने घेतला आहे. दोन दिवसांपासून ७० वर्षीय अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले असल्याची बातमी व्हायरल होत होती. मदर इंडिया चित्रपटात या साजिद खान यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. याशिवाय द सिंगिंग फ़िलिपिना, माय फनी गर्ल आणि द प्रिंस एंड आय अशा चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. मीडियामाध्यमाने त्यांचा एक बालपणीचा आणि तरुण वयातला एक जुना फोटो शेअर केला होता. तेव्हा अनेकांनी मुझसे शादी करोगी फिल्म दिग्दर्शक साजिद खानलाच श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. तर अनेकांचे रेस्ट इन पिसेस असे मेसेजेस सुद्धा त्याला येऊ लागले. हे मेसेजेस पाहून साजिद खान मात्र पुरता त्रासलेला पाहायला मिळाला.
काल रात्रीपासूनच त्याला अनेकांनी फोन देखील केले आणि तू जिवंत आहेस ना याची चौकशी केली. दरम्यान हे फोन कॉल्स आणि मेसेजेस आता तरी थांबवावेत या हेतूने साजिद खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत साजिद खान त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आगंभोवती पांढऱ्या रंगाचा कपडा लपेटून घेतो. आणि मी अजून जिवंत आहे हे अधोरेखित करताना म्हणतो की, “जे साजिद खान ७० वर्षांचे होते त्यांनी मदर इंडिया चित्रपटात सुनील दत्तच्या बालपणीची भूमिका साकारली होती ते साजिद होते. ते १९५१ साली जन्मले आणि मी २० वर्षानंतर जन्माला आलो. त्या बिचाऱ्या ७० वर्षाच्या साजिद खान यांचे निधन झाले पण काही मीडियातील लोकांनी साजिद खान म्हणून माझेच फोटो टाकले. काल रात्रीपासून आतापर्यंत मला रेस्ट इन पिसेसचे मेसेजेस येत आहेत.
तर काही लोकांनी मला फोन करून तू जिवंत आहेस ना? असेही म्हटले. मी मेलो नाही तर जिवंत आहे आणि तेही तुमच्या कृपेमुळे. तुमचंच तर मनोरंजन करायचं आहे मला . पण प्लिज मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मी जिवंत आहे आणि ज्या साजिद खान यांचे निधन झाले त्यांना मात्र मी मनापासून म्हणतो की त्यांना शांती लाभो”. अशी विनंती करत साजिद खानने मी जिवंत असल्याचे म्हणत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान साजिद खानने त्याचे कमेंट सेक्शन बंद करून ठेवले होते त्यामुळे त्याला जे साध्य करायचे होते ते त्याने मिळवलेले आहे. काही वेळापूर्वीच त्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.