त्याने तुमची महागडी वस्तू परत केली पण तुम्ही त्याच्यासाठी काय केलं ? अभिनेत्याच्या पत्नीने दिल सुंदर उत्तर
प्रवासात अनेकदा आपल्याकडून अनावधानाने काही गोष्टी हरवतात किंवा गहाळ होत असतात. अशा गोष्टी पुन्हा परत मिळवणे अगदी अशक्यच असते मात्र जर कोणी ती गोष्ट आपल्याकडे पुन्हा सुपूर्त केली तर तो आनंद गगनात मावेनासा होतो. खरं तर अशा वस्तू योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारी माणसंच आज हरवत चालली आहेत. पण राकेश साळवी या रिक्षावाल्याने ही माणुसकी जपलेली पाहायला मिळाली. राकेश साळवी हे मूळचे गुहागरचे. पण पोटापाण्यासाठी ते रिक्षा चालवण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वीच मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेता अंशुमन विचारे याचा महागडा मोबाईल हरवला होता. आपला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी अंशुमन खटपट करत होता. पण अचानकपणे त्याची पत्नी पल्लवीला राकेश साळवी यांचा फोन आला आणि अंशुमनचा मोबाईल त्यांच्याकडे असल्याचे कळवण्यात आले.
आपला हरवलेला फोन राकेश साळवी यांनी आपल्याकडे सुपूर्त केला हे पाहून अंशुमन आणि त्याची पत्नी दोघेही भारावून गेले आहेत. दोघांनी लगेचच जाऊन साळवी यांची भेट घेतली आणि आपला हरवलेला मोबाईल त्यांच्याकडून पुन्हा मिळवला. साळवी यांनी इमानदारीने आपला फोन परत केला म्हणून अंशुमनने त्यांचे आभार मानले आहेत. आजच्या युगात अशी माणसं आहेत म्हणूनच माणुसकी अजूनही जिवंत आहे याची खात्री पटते. अंशुमनने राकेश साळवी यांच्यासोबतचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ते पाहून नेटकऱ्यांनीही साळवी यांचे आभार मानले आहेत. साळवींचे कौतुक करणारा हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे अशा माणुसकी असणाऱ्या लोकांना यातून आणखीनच प्रेरणा मिळेल अशी आशा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काही विरोधी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. तर अनेकांनी त्या प्रामाणिकपणावर बक्षीस द्यायला हवे असेही सुचवले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ” त्या व्यक्तीने प्रामाणिक पणाने मोबाईल परत केला..त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा मनाचा मोठेपणाबद्दल तुम्ही पोस्ट शेअर केली ,तुम्ही त्याच्यासाठी काय केले हे कळणे गरजेचे आहे. फक्त thank you म्हणून काही उपयोग नाही. त्यांच्या प्रमाणिकपणाला काही मोल आहे की नाही”. या प्रतिक्रियेवर अंशुमनच्या पत्नीने एक प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ” त्यांच्या प्रमाणिकपणाची किंमत ठरवण्याची आमची पात्रता नाही आणि आम्ही त्यांना जे काही दिलं त्याची पब्लिसिटी करणे गरजेचे वाटत नाही.” असे पल्लवी विचारे यांनी म्हटले आहे.