माझा स्वामींशी संपर्क तुटला आणि १० व्या मिनिटाला… अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगितला स्वामींचा अनुभव
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. खरं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आजारपणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती. प्रिया बेर्डे यांना दुसरे लग्न करण्याचाही सल्ला देण्यात आला होता. मात्र मी माझी मुलं एकटीने वाढवू शकते असा विश्वास प्रिया बेर्डे यांना होता. मुलांचे शिक्षण आणि त्यांचे पालनपोषण नीट व्हावे म्हणून त्यांना पुन्हा जोमाने काम करणे तेवढेच गरजेचे होते. म्हणून मग अभिनय आणि स्वानंदीला त्यांनी बोर्डिंगमध्ये टाकले. आपल्या मुलांनी स्वबळावर काहीतरी करून दाखवावे ही त्यांची मनापासून इच्छा होती. पण एक वेळ अशी आली जेव्हा त्यांच्याकडे कुठलेच काम नव्हते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च कसा भागवावा हा त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न उभा होता. समोरची ही परिस्थिती पाहून त्यावेळी त्यांना खूप रडू कोसळले.
असे कठीण प्रसंग अमेकांच्याव आयुष्यात आले आहेत. या कठीण प्रसंगातून भक्तांना बाहेर काढण्याचे काम स्वामी समर्थांनी केलेले आहे. प्रिया बेर्डे यांनाही त्यांच्या कठीण काळात स्वामी समर्थांनी मार्ग दाखवला होता. या कठीण प्रसंगी अचानकपणे दादर येथील स्वामींच्या मंदिरातील स्वामींचा तो भला मोठा फोटो त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता आणि त्याच्या नंतर मात्र आयुष्यात एक चमत्कार घडून आला. खरं तर प्रिया बेर्डे या लहानपणापासूनच स्वामींच्या भक्त होत्या. वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षांपासून त्यांची आजी त्यांना स्वामी समर्थांच्या मठात घेऊन जायची. पण मधल्या काळात त्यांच्याशी संपर्क तुटला. मग त्या साईबाबांची भक्ती करू लागल्या. अगदी साईंचे दर्शन घेण्यासाठी त्या शिर्डीला जाऊ लागल्या. त्यांची पोथी वाचू लागल्या, त्यांचेच नामस्मरण करू लागल्या. पण अचानक एक काळ आला १२-१३ वर्षांपूर्वी तेव्हा यांच्याकडे काहीच काम नव्हते.
याबद्दल त्या म्हणतात की, ” त्यावेळी मी मुलांची शाळेची फी कशी भरू?, घराचा ईएमआय कसा भरू? या विचारात मी रडत असतानाच अचानकपणे मला दादरच्या मंदिरातील तो स्वामि समर्थांचा फोटो डोळ्यासमोर दिसला. त्याच्यानंतर दहा मिनिटातच मला एक फोन आला. ‘तुम्हाला सोलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी यायचंय आणि आम्ही त्याचे तुम्हाला एवढे एवढे मानधन देऊ’. असा तो आयोजकांचा फोन होता. त्या तेवढ्या पैशांत माझा प्रश्न सुटणार होता. मी शाळेची फी आणि घराचा ईएमआय भरू शकणार होते. त्याचवेळी मी स्वामींना दंडवत घालून तुम्हाला दरवर्षी भेटायला अक्कलकोटला येणार असे अश्वासन दिले. माझ्या तोंडात अजूनपर्यंत स्वामींचं नाव नेहमी असतं. स्वामींनी मला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढलं आहे आणि माझी त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. मला असं वाटतं की जिथे पॉजिटीव्ह गोष्टी असतात तिथे निगेटिव्ह गोष्टी सुद्धा असतात. तुम्हाला जर कुठे झोप लागत नसेल, अस्वस्थ जाणवत असेल अशावेळी मला स्वामीशिवाय दुसरा मार्गच सापडत नाही.”