“एक झोका…चुके काळजाचा ठोका” गाण्यातील ही चिमुरडी आठवते…पहा तब्बल 32 वर्षांनंतर आता दिसते अशी
१९९१ साली “चौकट राजा” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक अप्रतिम कलाकृती सादर करून चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या नकळत का होईना डोळ्यात पाणी आणले होते. संजय सुरकर दिग्दर्शित आणि स्मिता तळवळकर निर्मित अशा या चित्रपटातून दिलीप प्रभावळकर यांच्या अप्रतिम अभिनयाची झलक दिसून आली. त्यांनी साकारलेल्या नंदूच्या भूमिकेला त्यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कृत करण्यात आले होते. चित्रपटात स्मिता तळवळकर, दिलीप कुलकर्णी, सुलभा देशपांडे, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर निर्मिती सावंत, आशालता वाबगावकर, नयना आपटे, रिमा लागू यांचीही साथ चित्रपटाला लाभली होती.
“एक झोका, एक झोका,चुके काळजाचा ठोका एक झोका” हे चित्रपटातील गाजलेलं गाणं आजही रसिकांच्या काळजाचा ठोका चुकविल्याशिवाय राहत नाही. या गाण्यासोबतच ‘हे जीवन सुंदर आहे…’ आणि ‘मी असा कसा असा कसा… वेगळा’ ही गाणी देखील विशेष प्रभावी ठरलेली पाहायला मिळाली. या चित्रपटात स्मिता तळवळकर(मीनल) आणि दिलीप कुलकर्णी(राजन) यांची मुलगी अर्थात राणीची भूमिका साकारली होती “राजसी बेहरे” हिने. एक बालकलाकार म्हणून राजसीला या चित्रपटामुळे अमाप प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास 32 वर्षे झाली आहेत त्यामुळे साहजिकच राजसी बेहरे बद्दल अनेक प्रेक्षकांना जाणून घेण्याची ईच्छा आहे. चला तर मग आज राजसीबद्दल अधिक जाणून घेऊयात…
एक बालकलाकार म्हणून नावारूपास आलेली राजसी बेहरे आज अभिनय क्षेत्रापासून काहीशी दूर असलेली पाहायला मिळत आहे. मधल्या काळात ती अभिनय क्षेत्राशी निगडित होती परंतु त्यानंतर मात्र तिने या सृष्टीतून काढता पाय घेतला. पुढे मुंबई युनिव्हर्सिटी मधून तीने आपले पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर विस्तार टेक्नॉलॉजीस मधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी तिने प्राप्त केली. सध्या Hansa Cequity या मार्केटिंग कंपनीमध्ये वरिष्ठ सल्लागार या पदावर ती कार्यरत आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी राजसी बेहरे ही चैतन्य बिवलकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. चैतन्य बिवलकर हे Mindshare fulcrum या कंपनीत कार्यरत आहेत. आज राजसी अभिनय क्षेत्रापासून खूप दूर असली तरी चौकट राजा चित्रपटामुळे एक निरागस बालकलाकार म्हणून ती कायम रसिकजनांच्या स्मरणात राहील एवढे मात्र नक्की. राजसीला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!