आदेश वेळेवर येत जा हं कारण ती हल्ली त्या अविनाश बरोबर….रुपारेल कॉलेजमध्ये असताना सुमित राघवन सोबतचा किस्सा
आज २४ नोव्हेंबर रोजी हेमंत ढोमेचा “झिम्मा २” हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. मराठी पोरी, खेळू झिम्मा ही चित्रपटातील गाणी अगोदरच हिट झाली आहेत. त्यामुळे झिम्मा २ चित्रपट देखील हिट होणार अशी खात्री देण्यात येत आहे. दरम्यान झिम्मा चित्रपटाचे पार्ट २मध्ये रियुनियन पहायला मिळाले या चित्रपटाच्या निमित्ताने रुपारेल कॉलेजचे रियुनियन साजरे करण्यात आले. यावेळी आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सुमित राघवन, सचित पाटील, अजित परब, महेंद्र पवार या रुपारेल कॉलेजच्या मित्रांनी कॉलेजच्या कट्ट्यावर जाऊन पुन्हा एकदा तिथल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
१३ नोव्हेंबर रोजी याच कॉलेजच्या कट्ट्यावर असताना महेंद्र पवार यांनी आदेश आणि सुचित्राला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. त्याला ३३ वर्ष पूर्ण झाल्याची आठवण इथे सांगण्यात आली. आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांनी पळून जाऊन लग्न केले होते. खरं तर हे लग्न जुळवण्यासाठी सुमितची देखील या सर्वांना मोठी साथ मिळाली होती. अर्थात अभ्यासात लक्ष न देणारी ही मंडळी त्याकाळी मात्र एकांकिका स्पर्धेसाठी जीव ओतून काम करत होती. आदेश बांडेकरांनी सुचित्राला थेट घरी जाऊन प्रपोज केले होते तेव्हा सुचित्राने त्यांचा लग्नासाठीचा होकार दिला होता. आता हिने होकार दिला म्हणून आदेश बांदेकर निश्चिंत झाले होते. पण त्यावेळची एक गंमत सांगताना सुचित्रा बांदेकर म्हणतात की, ” त्याला मी होकार दिला होता त्यामुळे तो निर्धास्त राहिला होता की ही आता कुठेच जाणार नाही. पण मी जेव्हा कधी आदेशला फोन करून बोलवायचे तेव्हा तो येत नसायचा. तेव्हा मला खूप रडायला यायचं.
मग अविनाश हांडे माझ्याकडे येऊन माझी समजूत घालायचा. दोन चार वेळेला सुमीतने हे पाहिलं. पण पाचव्यांदा त्याने आदेशला सांगितलं की आदेश वेळेवर येत जा हं कारण ती हल्ली त्या अवनाश हांडे बरोबर जरा जास्त फिरते”… जवळच बसलेल्या आदेश बांदेकर यांनी देखील आपले हसू थांबवत सुमितने असा सल्ला दिला असल्याचे कबूल केले. कॉलेजची अजून एक आठवण सांगताना सुमित राघवन म्हणतो की आदेशने माझं शिक्षणच बंद केलं होतं. कारण आदेश बांदेकर रिझल्ट लागण्याच्या अगोदरच कोण पास होणार आणि कोण नापास होणार याचे भाकीत वर्तवत असत. मी नापास होणार हे तो अगोदरच सांगून देत असे आणि रिझल्ट सुद्धा तसाच येत असे त्यामुळे आदेशने माझं शिक्षणच बंद करून टाकलं होतं असे सुमित राघवन गमतीगमतीत म्हणून जातो.