मराठी सृष्टीत एका दर्जेदार दिग्दर्शकांपैकी एक म्हणून महेश मांजरेकर यांचे नाव घेतले जाते. मराठी सोबतच महेश मांजरेकर यांनी हिंदी सृष्टीतही चित्रपट गाजवले आहेत. येत्या नवीन वर्षात जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीत ते तब्बल ४ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला नाळ २ हा चित्रपट त्यांच्या पाहण्यात आला. नागराज मंजुळे यांचे चित्रपट दर्जेदार असतात पण नाळ २ चित्रपट पाहायला प्रेक्षकांची गर्दीच नव्हती हे त्यांना जाणवले. आणि म्हणूनच महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाबद्दल एक वक्तव्य केलं आहे. “नालायक पिक्चर्स बघतोच आपण त्याबरोबर नाळ२ पण बघुयात ना! अप्रतिम आहे! ” असे त्यांनी एका व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओत महेश मांजरेकर नाळ २ चित्रपटाबद्दल भरभरून बोलताना दिसले.
तसेच निर्मात्यांनाही त्यांनी एक सल्ला देऊ केला. ते म्हणतात की, ” काल मी नाळ २ हा सिनेमा पाहिला आणि मला अभिमान वाटला की मराठीत असा सिनेमा तयार होतोय.वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की फार लोकं नाहीयेत सिनेमाला. का? ते मला कळलं नाही. कारण तुम्हाला चांगला सिनेमा बघायचाय तर भाषा महत्वाची नसते. महाराष्ट्रात इतके अप्रतिम सिनेमे बनतायेत पण कोणी प्रेक्षकच बघायला येत नाहीत. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्याचं नशीब वाईट असेल त्याच्या नशिबात हा सिनेमा नाहीये, इतका सुंदर हा सिनेमा आहे. इराणचा माजिद माजिद हा उत्कृष्ट निर्माता आहे त्याने जरी हा चित्रपट पाहिला तरी तो या चित्रपटाला उत्तम म्हणेल. काही कन्नड चित्रपट आपण हिंदीत डब करतो आणि ते इथे बघतो. आर आर आर पुष्पा हे चित्रपट इथं पाहिले गेले . माझं मराठी निर्मात्यांना एवढंच म्हणणं आहे की , त्यांनी पण आपले सिनेमे डब करावेत. मला वाटतं नाळ २ हा सिनेमा देशातल्या सगळ्या लोकांनी बघायला पाहिजे. त्यात तीन मुलांनी सुंदर कामं केली आहेत.
जर उद्या कधी या चित्रपटाला नॉमिनेशन मिळालं ना तर कृपा करून त्या छोट्या मुलीला बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट म्हणून अवॉर्ड देऊ नका तर तिला एक बेस्ट ऍक्टरेस म्हणून अवॉर्ड द्या इतकं तिने सुंदर काम केलेलं आहे. श्यामची आई हाही एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा मी पाहिला. मराठी सिनेमे काहितरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही सरसकट सगळे मराठी चित्रपट पाहायला जा असं माझं मुळीच म्हणणं नाही पण ज्यावेळी एखादा चांगला सिनेमा येतो तेव्हा तुम्ही प्लिज त्याला सपोर्ट करा. माझी निर्मात्यांनाही विनंती आहे की तुम्ही तुमचे चित्रपट चांगले असतील तर ते हिंदीत डब करा जेणेकरून मराठी चित्रपट कंटेंट वाईज किती उत्कृष्ट असतात ते दाखवून द्या. “