हमाल दे धमाल चित्रपटाची अभिनेत्री तब्बल ३४ वर्षानंतर आता दिसते अशी… अभिनयाला रामराम ठोकून करते हे काम
१९८९ सालच्या हमाल दे धमाल या चित्रपटाने लक्ष्मीकांत बेर्डे यांना सुपरस्टार बनवले. हा चित्रपट दिग्दर्शित केला होता पुरुषोत्तम बेर्डे यांनी. खरं तर नाटकातून थेट चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे वळण्याआधी पुरुषोत्तम बेर्डे यांनी गिरीश घाणेकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केलं. एका हमलाला सुपरस्टार कसं बनवलं ही कथा घेऊन ते ‘हमाल दे धमाल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटात निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, महेश कोठारे, गिरीश घाणेकर, वैशाली दांडेकर, सुधीर जोशी, रमेश भाटकर, अशोक शिंदे यांच्यासह ते अगदी आदेश बांदेकर पर्यंत बरेचसे कलाकार छोट्या मोठ्या भूमिकेत झळकले. बजरंगाची कमाल, मी आलो, मनमोहना तू राजा अशी चित्रपटाची गाणी तुफान हिट झाली. या चित्रपटाची सहनायिका म्हणजेच वर्षा उसगावकर हिच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या वैशाली दांडेकर हिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
कारण या चित्रपटानंतर वैशाली दांडेकर काही मोजक्याच प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हमाल दे धमाल चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास ३४ वर्षे होत आहेत. त्यामुळे ही अभिनेत्री आता कशी दिसते, काय करते आणि कुठे असते याबद्दल जाणून घेऊयात. वैशाली दांडेकर ही मराठी तसेच हिंदी चित्रपट, मालिका अभिनेत्री आहे. १९८७ सालच्या ‘अंधा युद्ध’ या चित्रपटातून तिने हिंदी सृष्टीत पाऊल टाकले. त्यानंतर दूरदर्शनवरील ‘महानगर’ या मालिकेतून तिने रिमा लागू सोबत काम केले. प्रहार, जखमों का हिसाब, कर्ज तेरे खून का अशा हिंदी चित्रपटातून तिने सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले. पण कालांतराने वैशालीने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. सेंट लुईस हायस्कुलमधून वैशालीने शिक्षण घेतले होते. बी कॉमची पदवी प्राप्त केल्यानंतर वौशालीने एलएल एमची पदवी मिळवली. वकिलीमध्ये मास्टर्स डिग्री मिळवल्यानंतर वैशाली लॉ कॉलेजमध्ये शिकवायला लागली. मनोज गुरव यांच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर वैशालीने तिच्या नावात बदल केला. वैशाली गुरव या नावाने त्यांनी ओळख बनवली.
२०१२ साली दादर, मुंबई येथील ‘ ऍडव्होकेट बाळासाहेब आपटे लॉ कॉलेजमध्ये’ तिने मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला. गेल्याच वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये वैशाली दांडेकर यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली आहे. सध्या त्या आपल्या कुटुंबासोबत पुण्याला स्थायिक आहेत. दहा वर्षे प्रिन्सिपल म्हणून पदभार सांभाळताना त्यांच्या कामगिरीचे वेळोवेळी कौतुक झाले. मागील काही दिवसांपूर्वीच वैशाली दांडेकर यांच्या संदर्भात ‘विस्मृतीत गेलेली नायिका’ म्हणून आम्ही एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टचा इम्पॅक्ट म्हणून त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्याच कॉलेजचा विद्यार्थी ‘पुष्पक नार्वेकर’ याने आम्हाला कळवली. या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच वैशाली दांडेकर सध्या काय करतात आणि कशा दिसतात याची विस्तृत माहिती मिळाली. अशा विस्मृतीत गेलेल्या नायक नायिकांना प्रकाशझोतात आणण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्यातील हा एक छोटासा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी झाला. आणि तब्बल ३४ वर्षानंतर वैशाली दांडेकर ही नायिका प्रेक्षकांच्या समोर आली.