ऑस्ट्रेलिया मेलबर्न दिवाळी सेलिब्रेशन… टाळ लेझीमच्या गजरात झेंडे फडकवत वारीच्या नृत्यातून महाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीचे दर्शन
भारतीय परंपरा मेलबर्न ऑस्ट्रेलियाच्या रंगमंचावर. पंढरपूरच्या वारीचं मेलबर्नकरांना दर्शन. ‘रिदम अँड फोक’ या लोकनृत्य संस्थेने मेलबर्न मध्ये दिवाळी सेलिब्रेशन निमित्त मेलबर्नकरांना टाळ, लेझीमच्या गजरात, झेंडे फडकवत वारीच्या नृत्यातून महाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीचे दर्शन घडवले. टाळ्या आणि माऊली-माऊली च्या गजरात मेलबर्नकरही त्यात तल्लीन झाले. गेली कित्येक वर्ष रेश्मा परुळेकर हीने संस्थापित केलेली रिदम अँड फोक ही संस्था भारतातील विविध लोकनृत्य ऑस्ट्रेलियातील रसिकांसमोर सादर करीत भारतीय लोकनृत्याची उज्वल परंपरा सातासमुद्रापार जपत आहे.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. ह्या जिव्हाळ्यातूनच “मेलबर्न इंडियन थिएटर” ह्या संस्थेचा जन्म झाला. भारताबाहेर ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या नाटक वेड्यांना हक्काचा नाट्य मंच उपलब्ध व्हावा म्हणून २०१८ साली “मेलबर्न इंडियन थिएटर” ह्या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची स्थापना रश्मी घारे, रेश्मा परुळेकर व निलेश गद्रे ह्या तीन रंगकर्मींनी केली. प्रायोगिक नाट्य कलाकृती सादर करणं आणि त्या अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा संस्थेचा मूळ उद्देश. पण त्याबरोबरच ऑस्ट्रेलियातील स्थानिक लेखकांकडून लिहिलेली नाटकं सादर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यासाठी इच्छुक लेखकांशी शिबिरं घेण्यात आली आणि त्यातून नवीन कलाकृती निर्माण झाल्या.
ह्या प्रयत्नातूनच “चांदोबा चांदोबा भागलास का?”, “द पपेट्स”, “उरिकृ मम गति” ह्या एकांकिका, “पंचायतन” हे नृत्य नाट्य व “बंदिनी”, “फाइंडिंग निमो” ह्यासारख्या दोन अंकी नाटकांचे लेखन आणि निर्मिती मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे झाली. त्याबरोबरच “कट्यार काळजात घुसली” ह्या गाजलेल्या संगीत नाटकाचा रूपांतरित दीर्घांक सादर करण्यात आला. मेलबर्नमधे पूर्णपणे निर्मित “बंदिनी’ ह्या दोन अंकी नाटकाचे प्रयोग पुणे व मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहेत. ह्या नाटकाचे अनेक प्रयोग मेलबर्न येथे सादर झाले आहेत आणि नुकताच एक प्रयोग कॅनबेरा येथे सादर करण्यात आला. एका ओळीच्या वृत्तपत्रातील बातमीवर आधारलेलं हे नाटक उत्कंठावर्धक व मनोरंजक तर आहेच पण मूलगामी सामाजिक समस्यांचा आढावा घेणारं देखिल आहे.