प्रसिद्ध चित्रपट मालिका अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. भैरवी वैद्य या गेल्या ४५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी मोठ्या पडद्यासह, रंगभूमीवर तसेच टीव्ही शोमध्येही काम केले आहे. भैरवी यांच्या अचानक निधनाच्या बातमीने कळविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या ६ महिन्यांपासून त्या कॅन्सरने त्रस्त होत्या . कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी तोंड देताना त्यांची झुंज अयशस्वी ठरली. भैरवी वैद्य यांनी गुजराती आणि हिंदी अशा भाषेतून चित्रपट तसेच मालिकेतून काम केले आहे. अलीकडेच त्यांनी निमा डेन्झोंगपा या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.
याचसोबत हसरतें, महिसागर , व्हाट्स युअर राशी, क्या दिल ने कहा, ताल सारख्या चित्रपट मालिकेतून काम केले होते. अगदी ऐश्वर्या राय, सलमान खान यांच्यासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. हिंदी गुजराथी मधील त्यांच्या भूमिकांचे चाहत्यांनी नेहमी कौतुक केले होते. ताल या चित्रपटाद्वारे भैरवी यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यात त्यांनी जानकीची भूमिका साकारली होती. भैरवीने सलमान खानच्या चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. बॉलीवूड सृष्टीत येण्याअगोदर भैरवी यांनी गुजराथी नाटक आणि चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती.
भैरवीच्या दुःखद निधनाबद्दल व्हेंटिलेटरमध्ये प्रमुख भूमिका साकारणारा प्रतीक गांधी भावुक होत म्हणतो की , “मला त्यांच्यासोबत ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आमच्यात खरोखर चांगले बाँडिंग होते. त्या खूप प्रेमळ होत्या. लहानपणी स्टेजवर आणि टेलिव्हिजनवर परफॉर्म करताना मी त्यांना पाहिले आहे. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले गेले. त्यांचा सततचा हसरा चेहरा मी कधीही विसरू शकणार नाही.” निमा डेन्झोंगपा या शोमधील कलाकारांनीही भैरवी वैद्य यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.